राज्यातील साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:01+5:302021-04-23T04:24:01+5:30
श्रीपूर : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साखर कारखान्यांनी सॅनिटायझरची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. किमती स्थिर राहिल्या. आता ...
श्रीपूर : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साखर कारखान्यांनी सॅनिटायझरची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. किमती स्थिर राहिल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. साखर कारखान्यातील सहवीजनिर्मिती व आसवानी या प्रकल्पामधून मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करता येईल असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार सर्व कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर ऑफ जनरल शिवाजीराव देशमुख यांनी दिली.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे.
यापूर्वी बहुतांश आपत्कालीन परिस्थितीत साखर कारखान्यांनी मदत केली आहे. सद्यस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप चालू आहे आणि ज्यांचा सहवीजनिर्मिती व आसावनी प्रकल्प कार्यरत आहे अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्याचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा कारखाना त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. सध्या कोरोना परिस्थिती ही भयानक असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्रशासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तथापि सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
---
साखर कारखान्यांना कसा बनविता येईल ऑक्सिजन
साखर कारखान्यांच्या असावनी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बन डायऑक्साइड वेगळा करण्याचा अनुभव आहे. त्याकरिता फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करायचा झाल्यास त्यासाठी वाफ व विजेची गरज भासते. यासंदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्विंग ॲड्रसोंप्शन प्रोसेसिंग या प्रकल्पानुसार कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारावे. यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुद्धा कमी होईल, असे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
--
पांडुरंग कारखाना ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यास विचाराधीन
ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा अभ्यासपूर्वक काम चालू आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रोजेक्ट टाकावा लागतो. ऑक्सिजन प्रकल्पही दोन प्रकारचा असतो. एक लिक्विड स्वरूपात घेऊन ऑक्सिजन तयार करणे व दुसरा वातावरणामधून ऑक्सिजन घेऊन तयार करणे हे प्रकल्प चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते, जोपर्यंत कारखाने चालू आहे. तोपर्यंत ऑक्सिजन प्रकल्प चालवणे. आर्थिकदृष्ट्या कारखान्यांना परवडेल. हा प्रकल्प उभारण्यासाठी चार ते पाच महिने जातात. पांडुरंग कारखाना हा प्रकल्प उभा करण्यास विचाराधीन आहे.
- डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना श्रीपूर