पोलीस अन् जनतेच्या प्रयत्नाने साकारतेय वळसंग पोलीस ठाण्यात ऑक्सीपार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:24+5:302020-12-11T13:20:20+5:30
सोलापूर - परिसर स्वच्छ व सुंदर असले तर कार्यशैलीवर पडत असतो. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे परिसर ग्रीन व स्वच्छ ...
सोलापूर - परिसर स्वच्छ व सुंदर असले तर कार्यशैलीवर पडत असतो. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे परिसर ग्रीन व स्वच्छ असावा या सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ऑक्सिपार्क संकल्पनेला साद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून वळसंग पोलीस स्टेशनच्या आवारात हे ऑक्सिजन पार्क साकारले आहे.
येथील पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या महिन्यापर्यंत जप्त केलेली दुचाकी, चारचाकी वाहने अस्ताव्यस्त पडलेली होती. आवारात झाडेझुडपे वेडीवाकडी वाढली होती. पोलीस ठाण्यास २ हेक्टर ९३ आर इतकी मोठी जमीन असताना तिची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना वळसंग पोलीस ठाण्याचा चार्ज घेताना नवीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वच्छतेबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या आवारात पाचशे मीटर लांबीचे ट्रॅक तयार करण्यात आले.
ऑक्सिपार्क बनविण्यामध्ये वळसंगचे मुस्ताक शेख, कुंभारीचे सचिन झगडघंटे यांनी व पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांचा सहभाग होता. त्यात पोलीस हवालदार बिराजदार, श्रीनिवास दासरी, पोलीस नाईक अमोल यादव, शहाजन शेख, शरद चव्हाण, काळजे यांनी विशेष मेहनत घेतली.
७० झाडांची लागवड
गुरुवारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट डॉ. संतोष गायकवाड यांच्या उपस्थितीत सभोवती ऑक्सिजन निर्माण करणारे ७० झाडे लावण्यात आली आहेत. यासाठी इन्स्पायर फाउण्डेशन माढा येथील अजय शहा यांनी मदत केली आहे. हुतात्मा जलसंवर्धन समिती व ब्राइट अकॅडमी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. या ऑक्सिपार्कचा वळसंग गावातील महिला, ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे.
-----