उद्योगांना ‘बुस्ट’ देणारे पॅकेज; ठोस अंमलबजावणीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:34 AM2020-05-14T11:34:16+5:302020-05-14T11:36:27+5:30
आत्मनिर्भर अभियानाचे सोलापुरात स्वागत; व्यापारी-उद्योजकांकडून समाधान
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक महामंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतून उद्योजकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगांना बुस्ट देणारे पॅकेज जाहीर केले आहे. यातून मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाचे येथील उद्योग जगतातून स्वागत होत आहे. पॅकेजची अंमलबजावणी ठोसपणे झाल्यास आत्मनिर्भर भारत निश्चितच उदयास येईल, अशा भावना सोलापुरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.
स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल
- उद्योजकांना विनातारण कर्जाची व्यवस्था पॅकेजद्वारे करण्यात आली आहे. तसेच मायक्रो उद्योगांना एक कोटीपर्यंत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. पूर्वी ही मर्यादा २५ लाखांपर्यंत होती, ही दिलासादायक बाब आहे. यातून मायक्रो आणि लघु तसेच मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे. २०० कोटींपर्यंत टेंडर विदेशी कंपन्यांना देण्याचा निर्णय खूपच चांगला आहे. यातून स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल. पॅकेज उद्योगहितैषी आहे, फक्त त्याची अंमलबजावणी चांगल्यारीत्या व्हायला हवी, असे बालाजी अमाईन्सचे कार्यकारी संचालक राम रेड्डी यांनी म्हणाले.
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. गेल्या दोन महिन्यांच्या कोरोनाच्या नकारात्मक पार्श्वभूमीवर अत्यंत पॉझिटिव्ह घटना म्हटली पाहिजे. यासाठी जाहीर केलेले पॅकेजही आकर्षक आहे. यातून लघु आणि मध्यम उद्योगांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. लोकल ते ग्लोबल ही काळाची गरजच आहे. प्रिसिजन हे लोकल ते ग्लोबलचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. या पॅकेजमुळे देशाच्या मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.
- यतीन शहा, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड, सोलापूर
सोलापुरातील ९० टक्के यंत्रमाग उद्योजक हे मायक्रो उद्योगात मोडतात. उर्वरित दहा टक्के हे लघुउद्योगात येतात. त्यामुळे या पॅकेजचा फायदा यंत्रमाग उद्योगाला शंभर टक्के होईल. सोलापुरी टॉवेल व चादरला देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढेल.
- अंबादास बिंगी, खजिनदार, जिल्हा यंत्रमागधारक संघ
सूक्ष्म, लघु, मध्यम याची लिमिटची व्याख्या वाढविण्याचा केंद्राने आज निर्णय घेतला. तसेच ई पीएफ, इन्कम टॅक्सची तारीख वाढवली. अभय योजना तसेच टीडीएस/टीसीएस यामध्ये २५ टक्के सवलत देण्यात आली. विवाद से विश्वास तक या अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली. वीज वितरण कंपनीला ९०,००० कारोडचे अर्थिक सहाय्य दिले . याचे सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सने स्वागत केले आहेÞ.
- राजू राठी, चेंबर आॅफ कॉमर्स.
ट्रस्ट व करदाते यांचे परतावे लवकर दिल्याने त्यांना आर्थिक मदत होईल. रेरा प्रोजेक्ट व रजिस्ट्रेशन मुदतीत वाढ व टीडीएस, टीसीएस दरात २५ टक्के कपात झाल्याने कॉन्ट्रॅक्टर निश्चिंत मनाने काम पूर्ण करू शकतील. त्यांना दंड लागू होणार नाही. एकूण शेअर बाजार कोसळत असल्याने त्याचे म्युच्युअल फंडावर परिणाम होतात. परंतु एनबीएफसी, हौसिंग फायनान्स कंपनी व म्युच्युअल फंडासाठी रुपये ३०,००० कोटी दिल्याने त्यांना चांगली कामगिरी करून गुंतवणूकदारांना दिलासा देता येईल. एकूणच आर्थिक तरलता निर्माण केल्याने आर्थिक समतोल राखता येईल.
- अश्विनी आशिष दोशी,
सीए, माजी अध्यक्ष, सीए असोसिएशन, सोलापूर.
इन्कम टॅक्सला मुदतवाढ मिळाली आहे. तसेच टीडीएसच्या रेटमध्ये कपात झाल्याने व्यवसायातील पैसा व्यवसायातच राहील. याचा दिलासा उद्योजकांना निश्चित मिळेल. मायक्रो व लघु उद्योजकांना यातून शंभर टक्केफायदा होणार आहे. बँकांकडून कर्ज घेण्यात यापूर्वी अनेक अडचणी येत होत्या, त्या अडचणी आता कमी होतील. लहान उद्योग मोठ्या क्षमतेने गुंतवणूक करायला तयार होतील. पॅकेजमुळे रोजगार वाढेल. त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हायला हवी.
- व्यंकटेश चन्ना, सीए, सोलापूर.