पोषण आहारात अंडीसक्तीला विरोध करीत शिक्षणमंत्र्यांना पाठविली कडधान्याची पाकिटे; सकल जैन समाजाचा विरोध
By काशिनाथ वाघमारे | Published: December 28, 2023 08:19 PM2023-12-28T20:19:00+5:302023-12-28T20:19:12+5:30
जैन समाजातील विविध संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी रेल्वे स्टेशन येथील मुख्य पोस्ट कार्यालयात एकत्रित येत शासन निर्णयाचा निषेध नाेंदविला. प्रत्येक प्रतिनिधीकडून छोट्या खाकी पाकिटात ५० ग्रॅम भरड धान्य भरून ती पोस्टाने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावे पाठविली.
सोलापूर : शालेय पोषण आहारात मध्यान्ह भोजनात पहिली ते आठवीच्या मुलांना केळी आणि अंडी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याला सोलापुरातील सकल जैन समाजाने विरोध दर्शविला असून, या निर्णयाच्या निषेधार्थ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पोस्टाने ५० ग्रॅम कडधान्याची पाकिटे पाठविली.
जैन समाजातील विविध संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी रेल्वे स्टेशन येथील मुख्य पोस्ट कार्यालयात एकत्रित येत शासन निर्णयाचा निषेध नाेंदविला. प्रत्येक प्रतिनिधीकडून छोट्या खाकी पाकिटात ५० ग्रॅम भरड धान्य भरून ती पोस्टाने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावे पाठविली.
जैन सीनिअर सिटिझन्स, जैन सोशल ग्रुप, सैतवाळ सेवा मंडळ, भारतीय जैन संघटना, चंद्रप्रभू जैन मंदिर अतिशय क्षेत्र कुमठे या संघटना एकत्रित येत शासन निर्णयाचा निषेध नोंदवला. अंडीऐवजी पोषण आहारात मोड आलेली उसळी, शेंगा लाडू, राजगिरा लाडू देण्याची मागणी संघटनांनी यावेळी केली.
यावेळी जैन पुरुष प्रकोष्ठचे जयेश रामावत, श्रेयांसकुमार पंडित, प्रदीप पांढरे, बाहुबली भूमकर, नंदकुमार कंगळे, अरुणकुमार धुमाळ, गौतम छाजेड, श्याम पाटील, राहुल शहा, प्रकर्ष संगवे, राजश्री पांढरे, कल्पना शिरसोडे, प्रीती मेहता, साजिश शहा, सुनीती गेंगजे उपस्थित होते.
अंडीला पर्याय म्हणून भरडधान्यापासून तयार केलेले पदार्थ, ड्रायफ्रूट्स, फळे यांचा समावेश पोषण आहारात करणे गरजेचे आहे. अंडीच्या निर्णयामुळे सग्यासोयऱ्यांची पोल्ट्री फार्म चालतील. परंतु, भरडधान्यामुळे शेतीमालाच्या विक्रीला हातभार लागेल.
- साधना संगवे, जैन सैतवाळ, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख