२ जूनपासून सुरू होणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन
By Appasaheb.patil | Published: May 31, 2024 02:46 PM2024-05-31T14:46:49+5:302024-05-31T14:47:10+5:30
दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन अडीच महिने होते बंद होते. मंदिराचा गाभारा, सोळखांबी आदी भागातील काम पूर्ण झाले आहे.
सोलापूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मंदिराचे प्राचीन सौंदर्य खुलू लागले आहे. येत्या २ जूनपासून श्री विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.
दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन अडीच महिने होते बंद होते. मंदिराचा गाभारा, सोळखांबी आदी भागातील काम पूर्ण झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. वारकरी भाविकांना संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज काळातील सातशे वर्षांपूर्वीचे मंदिराची रूप पहावयास मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करताना मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा आलेली नाही. तसेच मूर्ती आणि मंदिराच्या संरक्षणास प्राधान्य देण्यात आले. सदरचे काम पूर्णत्वास आले असून २ जूनपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. सध्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने तयारीला वेग आला आहे. यंदाची आषाढी यात्रेत मोठया प्रमाणात वारकरी येतील अशी शक्यता गृहित धरून विविध उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.