पडघम वाजू लागले.. गुपचूप रणनीती; केलेली कामे दाखविण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:08+5:302021-07-28T04:23:08+5:30
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्याने येथील भविष्यात होणारी नगरपरिषदेची निवडणूक कशी होईल याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. सध्यातरी ...
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्याने येथील भविष्यात होणारी नगरपरिषदेची निवडणूक कशी होईल याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. सध्यातरी येथील नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधक हे महाआघाडीसारखेच एकत्रितपणे कामकाज करीत आहेत. नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असून, राष्ट्रवादी प्रणीत स्वाभिमानी गटाचे विरोधी पक्षनेते आहेत.
----
महाआघाडीमुळे सत्ताधारी, विरोधकांची जुळली नाळ
कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी व रिपाइंच्या गटातच आमनेसामने निवडणूक होत आली आहे. यात एखादा अपवाद वगळता शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या गटाचेच कायम नगरपरिषदेवर वर्चस्व प्रस्थापित आहे. गेल्या निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांचा स्वाभिमानी गट व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप यांचा रिपाइं गट एकत्र येऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे व नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या गटाविरोधात लढले होते. त्यात शिवसेनेने बाजी मारत नगरपरिषदेवर सत्ता काबीज केली होती. त्यानंतर मात्र काही दिवसांनी येथील सत्ताधारी व विरोधक एकत्रपणे कामे करू लागली. त्यातच राज्य सरकारही महाआघाडीचे स्थापन झाले. त्यामुळे तर येथील सत्ताधारी व विरोधकांत एक वेगळीच नाळ जुळून आली. ती अद्यापही कायम दिसत आहे.
----
नगरसेवक नसणारे करू लागले आंदोलने
तोपर्यंत येथे सध्या विद्यमान नगरसेवक नसणारे, पण काही पक्षांचे पदाधिकारी म्हणून शहरात कार्यरत असणारे काही कार्यकर्ते मात्र नगरपरिषदेच्या कामकाजाला विरोध करीत आंदोलने करीत असल्याचे दिसत आहेत. यावरून मात्र निवडणूक जवळ आली असल्याचे त्याचे पडघम वाजू लागल्याचे नागरिकांना भासू लागले आहे.
-----