अभिनेते विजय गोखले यांना पद्माकर देव स्मृती पुरस्कार; अकरा हजार रोख, स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप
By रवींद्र देशमुख | Published: February 15, 2024 06:49 PM2024-02-15T18:49:13+5:302024-02-15T18:49:25+5:30
हा पुरस्कार सोहळा प्रसिद्ध उद्योगपती किशोर चंडक यांच्या हस्ते तसेच उद्योजिका सुहासिनी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
रवींद्र देशमुख
सोलापूर: श्रुती मंदिर नाट्यसंस्थेचे संस्थापक कै.पद्माकर देव यांच्या नावे देण्यात येणारा देव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि सिनेकलावंत, प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा प्रसिद्ध उद्योगपती किशोर चंडक यांच्या हस्ते तसेच उद्योजिका सुहासिनी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख असे आहे. पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून श्रुती मंदिर या संस्थेचा हिरक महोत्सवी वर्षात हा पुरस्कार जाहीर करताना जेष्ठ विधिज्ञ जे.जे. कुलकर्णी, कार्यवाह प्रा. विद्या काळे, हिरक महोत्सवी वर्षाच्या स्वागताध्यक्ष डॉ.माधवी रायते हे उपस्थित होते. विजय गोखले यांची ४०-४५ वर्षांची कारकीर्द विचारात घेता, तसेच विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, त्यांच्या सुपुत्राकडून नाट्य विषयक अनुभव आणि विद्याधर गोखले यांच्या विषयी आठवणी या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत.
शनिवारी वितरण
हा समारंभ शनिवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात सायं सहा वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सर्व नाट्य कलावंत, रसिक आणि श्रुती मंदिर चे हितचिंतक यांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन हिरक महोत्सवी वर्षाचे कार्यवाह अमोल धाबळे यांनी केले आहे.