सोलापुरातील पद्मशाली बांधवांकडून पद्मावती मातेला साडीचोळीच्या आहेराची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:51 AM2019-11-13T10:51:27+5:302019-11-13T10:53:50+5:30
पाचशे वर्षांपूर्वीच्या ताम्रपटात उल्लेख; तिरुपती देवस्थानात आजही संग्रही, २१ नोव्हेंबरपासून तिरुपती येथे उत्सवास प्रारंभ, देशभरातून विणकर तिरुपतीला जाणार
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पद्मशाली समाजाची कुलकन्या माता पद्मावतीदेवी यांच्या जीवनाची माहिती दर्शवणारा पाचशे वर्षांपूर्वीचा ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानच्या संग्रही आहे़ श्रीकृष्णदेवराय यांच्या काळातील या ताम्रपटाला ऐतिहासिक महत्त्व असून, या ताम्रपटाच्या आधारावरच तिरुपती देवस्थानच्या वतीने आयोजित ब्रह्मोत्सवात देशभरातील पद्मशाली समाज बांधवांना माता पद्मावतीला साडीचोळीचा आहेर करण्याचा मान दिला जातो़ येत्या २१ नोव्हेंबरपासून तिरुपती देवस्थानच्या वतीने उत्सवाचे आयोजन केले आहे. २५ नोव्हेंबरला देशभरातील पद्मशाली बांधवांना माता पद्मावतीला साडी अर्पण करण्याचा मान मिळणार आहे. याकरिता सोलापुरातील समाज बांधव देखील जाणार आहेत.
माता पद्मावतीला सोलापुरी पैठणी साडी अर्पण करण्याकरिता पश्चिम महाराष्ट्र संघम्ने पुढाकार घेतला आहे़ याच धर्तीवर आता पद्मशाली ज्ञाती संस्था तयारी करणार आहे़ लवकरच बैठक घेऊन याची तयारी करू, असे ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अधिक माहिती देताना ज्ञाती संस्थेचे विश्वस्त तथा माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांनी सांगितले, पद्मशाली समाजाचे मूळपुरुष श्री भावनाऋषी हे आहेत़ ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रामधील भृगू महाऋषी हे एक ऋषी होत़ नऊ ब्रह्मऋषींपैकी भृगू ऋषी हे अत्यंत प्रभावी ऋषी होते़ भृगू महाऋषी हे दक्षप्रजापती यांची कन्या ख्याती हिच्याशी विवाह केला़ भृगू महाऋषींना धाता आणि विधाता असे दोन पुत्र तसेच लक्ष्मीदेवी नावाची कन्या होती. पद्मशाली समाज हा भगवान श्रीहरी यांची सासुरवाडी तसेच लक्ष्मीदेवीचे माहेर म्हणून ओळखला जातो़ महालक्ष्मीदेवी या अलुमेलू मंगम्मा यांच्या स्वरूपात अवतरल्या़ अलुमेलू मंगम्मा या पद्मशाली समाजाची कन्या आहेत़ त्यामुळे त्यांना पद्मावती असे देखील म्हटले जाते.
अलुमेलू मंगम्मा या श्री व्यंकटेश्वरांची पट्टपुराणी अर्थात राणी होत़ अलुमेलू मंगम्मा या तालपाक चिन्नना यांना स्तनपान केल्यामुळे त्यांना कवित्व प्राप्त झाले़ आंध्रकवी स्वामी अन्नामाचार्य यांच्यापेक्षा चिन्नना हे लहान होते़ श्री व्यंकटेश्वर यांनी चिन्नना यांना मकरकुंडल दिल्याचे पुराणशास्त्रात नोंद आहे आणि चिन्नना हे पद्मशाली समाजातील विणकरांना गुरुस्थानी होते़ त्यांनीच ताम्रपट लिहिला़ त्यात अलुमेलू मंगम्मा या पद्मशाली समाजाची कन्या असल्याचा उल्लेख आहे़ आणि सदर माहिती खुद्द मंगम्मा यांनी दिल्याची नोंद ताम्रपटात नोंद आहे.
ताम्रपटात काय उल्लेख आहे
- अलुमेलू मंगम्माच्या वतीने पद्मशाली वंशज हेच माझे माहेर आहे, अशी साक्ष दिल्याने त्याकाळी पद्मशाली वंशज भक्तीने आणि कृतज्ञतेने १० हजार सुवर्ण मुद्रा अर्पण केले़ दानशासन ताम्रशासन लिहून दिले़ तसेच चिन्नना यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी प्रतिवर्षी प्रत्येक हातमाग विणकरांनी एक वस्त्र अर्पण केले पाहिजे, अशी ताम्रपटात नोंद आहे़ यालाच ताम्रपट शासन असे म्हणतात़ हे शासन दोन ताम्रपटात नोंद केलेले आहे़ पहिल्या ताम्रपटात श्री व्यंकटेश्वरांचे मूळ स्वरूप तर दुसºया छायाचित्रात अलुमेलू मंगम्मा यांचे रेखाचित्र कोरलेले आहे़ ताम्रपटात शासनाचे विवरण लिहिले असून, हे दोन ताम्रपट तिरुपती देवस्थानच्या संग्रहालयात सुरक्षित आहेत.
अलुमेलू मंगम्माला साडी अर्पण करण्याकरिता २०१२ साली तिरुपती देवस्थानकडून विशेष निमंत्रण आले होते़ त्यांनी संस्थेशी पत्रव्यवहार केला़ पत्राच्या आधारावर आम्ही तिरुपती देवस्थानशी संपर्क साधून मातेला साडी-चोळी आहेर करण्यासाठी गेलो़ तेथे मोठा मानसन्मान येथील समाज बांधवांना मिळाला़ नोव्हेंबर महिन्यात होणाºया ब्रह्मोत्सवात माता पद्मावतीला साडीचा मान देवस्थानकडूनही दिला जाता़े साडीची हत्तीच्या अंबारीवरून भव्य मिरवणूक काढली जाते़ या मिरवणुकीत देशभरातील समाज बांधव उपस्थित असतात़ सदर मिरवणूक म्हणजे समस्त पद्मशाली समाजाचा बहुमान असतो़ प्रतिवर्षी हा मान मिळावा, याकरिता मी तिरुपती देवस्थानकडे पाठपुरावा केला़ ज्ञाती संस्थेच्या विद्यमान पदाधिकाºयांनी देखील याकरिता पाठपुरावा करावा़
- जनार्दन कारमपुरी
माजी अध्यक्ष, विद्यमान विश्वस्त : पद्मशाली ज्ञाती संस्था, सोलापूर