पन्नास दिवसांमध्ये दीड कोटींचा दंड भरला; मात्र सोलापूरकरांनी नियम नाही पाळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:32 PM2021-05-24T17:32:52+5:302021-05-24T17:32:59+5:30
कोरोनाशी दोन हात : नाकाबंदी, पेट्रोलिंगदरम्यान कारवाई
सोलापूर : कोरोनाच्या लढाईत शहरवासीयांनी गेल्या ५० दिवसांत दीड कोटी २० लाख २०० रुपयांचा दंड भरला, मात्र नियम पाळला नाही. सतत रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या व पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी कारवाई केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूरनाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवर दररोज पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवरदेखील नाकाबंदी करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेत अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील भाजीमार्केट असलेल्या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.
नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर ५०० रुपयांचा दंड लावला जातो. दुकाने चालू ठेवलेल्या दुकानदारांवर उल्लंघन कशा पद्धतीने केला आहे. याचे स्वरूप पाहून किमान २००० रुपये, तर जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतचा दंड लावला जातो. डबलसीट फिरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम अन्वये ५०० रुपयांचा दंड लावला जातो. शहरातील विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आळा बसावा यासाठी नाकाबंदी दरम्यान अनेक दुचाकी जप्त केल्या जात आहेत. दि.१ एप्रिल ते २२ मे दरम्यान दररोज अडीच ते साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वसूल केलेले पैसे भरले जातात शासनाच्या खात्यावर
- नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम दुसऱ्या दिवशी त्रेझरी येथे शासनाच्या खात्यावर भरली जाते. सोलापूर महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ही शासनाच्या खात्यावर जमा केली जाते.
ग्रामीण भागात अवघ्या पाच दिवसांमध्ये २९ लाख ६७ हजारांचा दंड
- ग्रामीण भागामध्ये ११ तालुक्यांतील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये २९ लाख ६७ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये विनामास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, वेळेनंतर चालू असणाऱ्या दुकानांवर कारवाई करणे, वाहनांवरील कारवाई, ई-पास नसताना प्रवास करणे आदी कारवायांचा समावेश आहे.
संचारबंदी जाहीर केल्यापासून दररोज कारवाई सुरू आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत. लोकांनी कुराणाचा गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर पडू नये. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल.
-डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त