सोलापुरात घरावरुन गेलेल्या हायप्रेशर तारांचा शॉक बसून पेंटरचा मृत्यू
By रवींद्र देशमुख | Published: March 28, 2024 06:42 PM2024-03-28T18:42:53+5:302024-03-28T18:43:22+5:30
अजय दुधगे या पेंटरने हुच्चेश्वर नगरातील एका घराला कलर देण्याचे काम घेतले होते.
सोलापूर : घरांवरुन गेलेल्या हायप्रेशन मेन लाईनच्या ताराला स्पर्श झाल्यानं रंगकाम करणाऱ्या पेंटरला हकनाक जीव गमवावा लागला. स्वागत नगरच्या शेजारी असलेल्या हुच्चेश्वर नगरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अजय जीवन दुधगे (रा. भारत नगर, कुमठा नाका, सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या पेंटरचे नाव असल्याचे समोर येत आहे.
या घटनेची खबर मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यातील अजय दुधगे या पेंटरने हुच्चेश्वर नगरातील एका घराला कलर देण्याचे काम घेतले होते. गुरुवारी त्याने रंग देण्यास सुरु केली असता दुपारी घरावरुन गेलेल्या हायप्रेशन मेनलाईनला स्पर्श झाल्यानं शॉक बसून अचानक त्याच्या सर्वांगास भाजल्याने शरीर काळे पडले. गच्चीवरील लोखंडी टीप अन्य साहित्य जळाले. भितीलाही तडे गेल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी तातडीने भाजलेल्या अवस्थेतील पेंटरला शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले.
मेन लाईन हटवण्याची अनक दिवसांपासूनची मागणी
शहरातील कुमठा नाका, स्वागत नगर, नागेंद्र नगर या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावरुन महावितरणच्या उच्चदाब विद्युत तारा गेल्या आहेत. त्या हटवल्या जाव्यात यासाठी गेली अनेक दिवसांपासून येथील नागिरकांनी महावितरणकडे मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.
जबाबदार कोण?
गेली अनेक दिवसांपासून धोकादायक मेन लाईन घरावरुन हटवावी अशी मागणी होत असताना याची दखल घेतली गेली नाही. आता मृत्यू पावलेल्या अजय दुधगे यांच्या मरणाला जबाबदार कोण असा सवाल हुच्चेशवर नगरातील रहिवाशांनी केला आहे.