विशाखापट्टणम येथे नेऊन केला सोलापुरातील पेंटरचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:05 PM2019-08-22T13:05:04+5:302019-08-22T13:07:36+5:30
सोलापूर शहर पोलीसांनी केली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : दोन तासांचे काम आहे असे सांगून घरातून घेऊन गेलेल्या इसमाला विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे नेऊन खून केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खासगी फिर्याद दिल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
कचरुद्दीन बांगेरी (वय ५२, रा. मदर इंडिया झोपडपट्टी चमडा कारखाना शेजारी, कुमठा नाका, सोलापूर), तुषार गोपीचंद कोळी (वय ३०, रा. मुळेगाव तांडा, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महिबूब सय्यद शेख (वय ३०, रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) हा पेंटर कारागीर होता. तो १० मे २०१९ रोजी आपल्या घरात काम करीत होता, तेव्हा दोन्ही आरोपी आले. दोघांनी महिबूब शेख याला अवघ्या दोन तासांचे काम आहे, तामलवाडी येथे जाऊन येऊ असे म्हणाले. महिबूब याची इच्छा नसतानाही दोघांनी बळजबरीने घेऊन गेले. रात्री १0 वाजले तरी महिबूब शेख घरी आला नाही म्हणून आई नसिमा शेख (वय ५८) यांनी कचरोद्दीन बांगेरी याच्या मोबाईलवर फोन करून चौकशी केली. कचरोद्दीन याने आम्ही तिघे आहोत, काळजी करू नका असे सांगितले.
तीन दिवस झाले तरी महिबूब घरी आला नाही, नंतर तुषार कोळी याच्या मोबाईलवरून महिबूब याने घरी फोन केला. ट्रक ड्रायव्हरने मला खूप लांब आणले आहे, मी कोठे आहे मलाच माहीत नाही. हे लोक मला खूप मारहाण करीत आहेत. मला बळजबरीने घेऊन जात आहेत असे म्हणत असताना त्याचा मोबाईल बंद झाला. घरच्यांनी त्याच मोबाईलवर अनेकवेळा फोन केला; मात्र तो बंद लागत होता. १५ मे २0१९ रोजी रात्री २.३0 वाजता शौकत बक्षी याला कचरुद्दीन शेख याने महिबूबचा विशाखापट्टणम येथे मृत्यू झाल्याची माहिती सांगितली.
घरच्या लोकांनी नक्कापल्ली जि. विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे धाव घेऊन पाहणी केली असता तेथे महिबूब हा गंभीर जखमी होऊन मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आरोपींनी जबरदस्ती करीत महिबूब याचा मृतदेह सोलापुरात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी सोलापुरात फिर्याद देऊनही खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता. शेवटी महिबूब याच्या भावाने सोलापूरच्या न्यायालयात धाव घेतली, दिलेल्या फियार्दीवरून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
नक्कापल्ली येथील गार्डने सांगितले सत्य
- नक्कापल्ली येथील एका कंपनीच्या आवारात महिबूब शेख याचा मृतदेह पडला होता. महिबूबच्या घरच्यांनी तेथे जाऊन पाहणी केली, संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र म्हणावी तशी दखल तेथे घेण्यात आली नाही. कंपनीतील एका सिक्युरिटी गार्डने महिबूब शेख याला बेदम मारहाण करून खून केल्याचे सांगितले. यामध्ये कचरुद्दीन बांगेरी व तुषार कोळी हे दोघेही होते अशी माहिती नातेवाईकांना दिली होती.