पाकिस्तान सरकार जगात सर्वात ढोंगी देश, अॅड. उज्ज्वल निकम यांचे मत, कुलभूषणच्या आई, पत्नीकडून काहीतरी वदवून घेण्याची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:20 PM2017-12-25T12:20:32+5:302017-12-25T12:25:56+5:30
कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीनेही भेट नाकारावी आणि एकांतात भेटण्याची मागणी करावी. कुलभूषण जाधवांवर दबाब आणून पाकिस्तान त्यांच्याकडून आई आणि पत्नीसमोर काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भीती
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २५ : कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीनेही भेट नाकारावी आणि एकांतात भेटण्याची मागणी करावी. कुलभूषण जाधवांवर दबाब आणून पाकिस्तान त्यांच्याकडून आई आणि पत्नीसमोर काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भीती व्यक्त करीत पाकिस्तान सरकार जगात सर्वात अधिक ढोंगी असल्याची भावना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.
खासगी कामानिमित्त अॅड. उज्ज्वल निकम कासेगाव (ता. पंढरपूर) येथे आले होते, यावेळी त्यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे निकम म्हणाले, पाकिस्तान सरकार भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीची भेट घडवून देत आहे. ही भेट मानवतावादी दृष्टिकोनातून नसून ढोंगीपणाने घडवून आणली जात आहे. कारण याबाबत आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध माध्यमांना बोलवण्याची गरजच काय होती?, असा प्रश्न विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे. भारतीय दुतावासाच्या अधिकाºयांसमोर कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीची भेट घडवून आणावी अन्यथा पाकिस्तानचे हे नाटक असल्याचे सिद्ध होईल, असे ते म्हणाले. पाकिस्तानने भारतीय दुतावासाच्या अधिकाºयांना तसेच आई आणि पत्नीला एकांतात भेटू दिले नाही तर भारत सरकारने देखील पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत यावेळी बोलताना निकम यांनी व्यक्त केले.