सोलापुरात पालेभाज्यांचे भाव तिपटीने कडाडले; कांदा, बटाटे अन् टोमॅटो मात्र स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:17 PM2019-04-05T14:17:46+5:302019-04-05T14:21:13+5:30
ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे.
सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. टोमॅटो, कांदा, बटाटे वगळता बाजारपेठेत बहुतांश पालेभाज्यांचे दर या आठवडाभरात चक्क तिपटीने वाढले आहेत. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे. किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान मानत असल्याच्या प्रतिक्रिया लक्ष्मी मंडईतील व्यावसायिकांतून उमटल्या.
मंद्रुप, नान्नज, तिºहे, कामती, बोरामणी, उळे, कासेगाव अशा उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यातूनही शहराला भाज्यांचा पुरवठा होतोय़ दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र पाण्याचा तुटवडा असल्याने पालेभाज्या उगवण्याऐवजी पेरलेले बियाणे जळून गेले आहे आणि उगवण कमी झाली़ परिणामत: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच भाजी मंडयांमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आणि दर तिपटीवर पोहोचला़ भेंडी आणि दोडक्याचे दर या आठवडाभरात हळूहळू वाढत गेले.
या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.
गवारी उगवण्याआधीच जळाली
- उन्हाळ्यात गवार उगवत असताना याला पाणी मोठ्या प्रमाणात लागते़ मात्र सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे़ अनेक शेतकºयांचे बोअरवेल बंद आहेत, बहुतांश शेतकºयांच्या बोअरवेलची पाणीपातळी पाचशे फु टाच्या खाली गेली आहे़ काही ठिकाणी गवार उगवलीच नाही़ जळून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ उन्हाळ्यात हे पीक शेतकºयाला बºयापैकी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते़.
वांग्याला उचल नाही
- भाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिला. परिणामत: साधी आणि काटेरी वांग्याची आवक पुरेशा प्रमाणात असूनही याला उठाव नाही़ अशीच स्थिती कांदा (१२ रुपये किलो), बटाटे (२० रुपये किलो), लसूण (४० रुपये किलो) यांच्याबाबत असल्याचे भाजीपाला व्यावसायिक सांगतात.
मागील चार माहिन्यांत यांचे दर वाढलेले नाहीत. मे महिना अधिकच कडक आणि कोरडाठाक मानला जातो़ या काळात दरवर्षी भाज्यांचे दर भडकतात़ मात्र मागील पाच वर्षात प्रथमच दर तिपटीने कडाडले आहेत़ मे महिन्यात या सध्या बाजारपेठेत असलेल्या भाज्यांचे दर आणखी भडकतील, आवकही घटेल अशी स्थिती आहे़
- सागर चव्हाण, भाजी विक्रेता