तळावर विसावले संतांचे पालखी सोहळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:16+5:302021-07-20T04:17:16+5:30

पंढरपूर : गरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पूर्वसंध्येला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज ...

Palkhi ceremonies of saints resting on the bottom! | तळावर विसावले संतांचे पालखी सोहळे !

तळावर विसावले संतांचे पालखी सोहळे !

Next

पंढरपूर : गरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पूर्वसंध्येला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह संतांच्या मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर हरिनामाचा गजर करीत विसावल्या. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली- संत सोपानकाका बंधू भेट माऊलीच्या मंडपात आणि संत तुकोबाराय- संत निळोबारायांच्या भेटीचा सोहळा तुकोबारायांच्या मंडपामध्ये रंगला. कोरोनाचे सावट असूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.

आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त वाखरीत प्रमुख संतांच्या दहा पालख्या येणार असल्याने पालखी तळावर प्रशासनाकडून जय्यत नियोजन केले होते. दुपारी ३ वाजता सर्वप्रथम आळंदीतून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दाखल झाला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातून रुक्मिणी माता पालखी दाखल झाली. त्यानंतर संत सोपान काका (सासवड), संत एकनाथ महाराज (पैठण), संत निवृत्तिनाथ (त्रंबकेश्वर), संत चांगावाटेश्वर (सासवड), संत मुक्ताबाई (जळगाव), संत निळोबाराय (अहमदनगर), तुकाराम महाराज (देहू, पुणे) अशा टप्प्याटप्प्याने एकेक पालखी सोहळे पालखी तळावर दाखल झाले.

वाखरी पालखी तळावर आल्यानंतर बसमधून भाविक उतरताच प्रत्येक पालखीतील भविकांच्या कोरोना चाचण्या, तापमान तपासले. त्यानंतर मंदिर प्रशासन, नगरपालिका, वाखरी ग्रामपंचायतीकडून पालखी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्या मानाच्या पालख्या पालखी तळावर ठरवून दिलेल्या शामियानामध्ये भजन-कीर्तनाच्या गजरात विसावल्या. अख्खा पालखी तळ ज्ञानोबा- तुकोबांच्या गजरात न्हाऊन निघाला.

प्रत्येक वर्षी आषाढी यात्रा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतांसह अन्य संतांच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येक वर्षी या पालखी तळावर तब्बल सहा ते आठ लाख भाविकांची गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होत असल्याने मानाच्या दहा पालख्या व त्यात प्रत्येकी ४० भाविक असल्याने हे तीस एकराचे भव्य पालखी तळ रिकामे दिसून आले.

-----

प्रशासनाकडून पालख्यांचे स्वागत

यावेळी प्रशासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माउलींच्या व इतर संतांच्या पालख्यांचे स्वागत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्विनी सातपुते, नगराध्यक्ष साधना भोसले, आ. समाधान औताडे, आ. प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील‌ बेल्हेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, माधवी निगडे आदी उपस्थित होते.

-----

बंधुभेट, गुरुशिष्य भेटीचा सोहळा मोबाईलमध्ये टिपला

प्रत्येक वर्षी पायी वारी चालत असताना संत ज्ञानेश्वर व संत सोपानकाका यांचा बंधुभेट सोहळा पिराची कुरॉली टप्प्यावर होत असतो. मात्र गतवर्षापासून पायी सोहळा रद्द झाल्याने हा सोहळा वाखरी पालखी तळावर होत आहे. दोन्ही पालख्यातील पादुकांच्या भेटी माऊलीच्या मंडपात घडवल्या. हा सोहळा मोजक्या भाविकांनी डोळ्यात टिपला. त्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय पालखी तळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या भेटीला त्यांचे शिष्य निळोबाराय वाजत गाजत गेले. तुकोबारायांच्या पालखी मंडपात या गुरूशिष्याच्या भेटीचा रंगलेला सोहळा अनेकांनी आपल्या डोळ्यासह मोबाईल कॅमेऱ्यात टिपला.

----

पायी चालण्यावरुन पालखी प्रमुख प्रशासनामध्ये वाद

पालखी सोहळ्याचे नियम ठरवून देताना वारकऱ्यांच्या आग्रहानंतर वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गावर इसबावी विसाव्यापर्यंत सर्व पालख्याना पायी चालत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. तिथून पुढे पंढरपूरपर्यंत फक्त एक भाविक पादुका घेऊन व दुसरा एक सोबत असे दहा पालख्यांमधील वीस भाविक पायी चालत जातील व बाकीचे बसने असे नियोजन होते. मात्र पालखी तळावर आल्यानंतर वारकऱ्यांनी आपला पवित्रा बदलला. सर्वच भाविकांना पायी चालत जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे प्रशासन व पालखी प्रमुखांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, प्रांताधिकारी, पालखी प्रमुखांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. तोपर्यंत बाकीचे वारकरी भजन, कीर्तनात तल्लीन होते.

------

Web Title: Palkhi ceremonies of saints resting on the bottom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.