गजानन महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात; गण गण गणात बोतेचा जयघोष...
By Appasaheb.patil | Published: June 21, 2023 07:25 PM2023-06-21T19:25:56+5:302023-06-21T19:26:11+5:30
यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सोलापूर : पंढरीच्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्रीक्षेत्र शेगांव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याने बुधवारी सायंकाळ साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठाेंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, भाजप नेते शहाजी पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी पडदूने, तहसिलदार राजशेखर लिंबारे, तहसीलदार सैपन नदाफ, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आदी अधिकारी व मान्यवरांनी पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचे स्वागत करण्यात आले. सलग दोन वर्ष प्रशासनातील अधिकारी या पालखीचे स्वागत करीत आहेत. आज पालखीचा मुक्काम उळेगावात आहे. येथे रात्री किर्तन, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर उद्या गुरूवार २२ जून २०२३ रोजी पहाटे ही पालखी सोलापूर शहरात दाखल होणार आहे. हा पालखी सोहळा दोन दिवसासाठी सोलापुरात मुक्कामी असणार आहे.