रंगसिद्ध-चिमराया-लक्ष्मी देवीचा पालखी भेट सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 07:04 PM2019-10-28T19:04:19+5:302019-10-28T19:05:39+5:30
प्रथम तामदर्डी येथील रंगसिद्ध चिमराया देवाची पालखी मुंडेवाडीच्या शिवारात दाखल झाली
सोलापूर :- सूर्य मावळतीकडे झुकलेला... चळळाम, ढोलांचा गजर... खरिक, खोबरे अन् भंडाऱ्याची उधळण... रंगसिद्ध-चिमराया महाराज की जय, लक्ष्मी देवीच चांगभलं... अशा जयघोषात नयनरम्य, भक्तिमय वातावरणात पालखी भेट सोहळा उत्साहात पार पडला.
ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंडेवाडी (ता. मंगळवेढा) गावच्या शिवारात दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी पालखी भेट सोहळा झाला.
प्रथम तामदर्डी येथील रंगसिद्ध चिमराया देवाची पालखी मुंडेवाडीच्या शिवारात दाखल झाली. त्यानंतर मुंडेवाडी येथून ढालकाटी आली. त्यापाठोपाठ लक्ष्मी देवीची पालखी मिरवणुकीने लेझीम पथकासह शिवारात आली. गजीढोल व हलगीच्या कडकडाटात दोन्ही पालख्या खेळविण्यात आल्या. त्यानंतर हवेत उंचावून भेटीचा सोहळा झाला. दरम्यान हजारो भाविकांनी खारीक, खोबरे व भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली. याप्रसंगी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
ज्वारीची धाटे झाली भुईसपाट
१५ दिवसापूर्वीच ज्वारीची पेरणी झाली होती. ज्वारीचे धाटे तरारून डोलू लागली होती. मात्र याच ठिकाणी पालखी भेट सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी ज्वारीची धाटे तुडवली. त्यामुळे ती भुईसपाट झाली. मात्र दोन दिवसानंतर ती धाटे पुन्हा जोमाने वाढू लागतात, असे येथील भाविकांनी सांगितले.