विठूमाऊलीच्या भेटीसाठी पालखीमार्ग आसुसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:17 AM2021-06-02T04:17:56+5:302021-06-02T04:17:56+5:30

पंढरपूर : कोरोना महामारीमुळं गतवर्षीही आषाढीसह चारही यात्रासोहळे पार पडले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना घरीच बसून पांडुरंगाचे मनोमन दर्शन ...

Palkhi Marg Asusala for Vithumauli's visit! | विठूमाऊलीच्या भेटीसाठी पालखीमार्ग आसुसला!

विठूमाऊलीच्या भेटीसाठी पालखीमार्ग आसुसला!

googlenewsNext

पंढरपूर : कोरोना महामारीमुळं गतवर्षीही आषाढीसह चारही यात्रासोहळे पार पडले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना घरीच बसून पांडुरंगाचे मनोमन दर्शन घ्यावे लागते. वर्षानुवर्षे सवय झालेल्या पालखीमार्गाला वारकऱ्यांचा पदस्पर्श झाला नाही. वारकऱ्यांसह पालखीमार्गही विठू माऊलीच्या भेटी आसुसला आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात पालखीमार्गावरील गावोगावच्या कारभाऱ्यांनी ‘यंदा वारी व्हायलाच पाहिजे’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

गुरुवारी यात्रेच्यानिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्येे यात्रेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. काेरोना संसर्गजन्य आजारामुळे गतवर्षी आषाढी यात्रेचा पालखी सोहळा प्राथमिक स्वरुपात साजरा झाला. शासनाच्या आदेशाने आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या संतांच्या पालख्या एस. टी. ने पंढरपूरला आणल्या गेल्या. मंदिरात देखील मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. प्राथमिक स्वरुपात आषाढी यात्रा सोहळा करून परंपरा खंडित होऊ दिली नव्हती. यंदा मात्र आषाढी सोहळा व्हायला हवा, अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सध्या कोरोनाचे संकट कमी होताना दिसून येत आहे. यामुळे यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या संताच्या पालख्या यंदा एस. टी. बसने पंढरपुरात न आणता. मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित पायी आणण्यास परवानगी मिळावी, ही पायी यात्रेची परंपरा अखंडित ठेवावी, अशी मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. आषाढी यात्रा कसा साजरी करायचा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गुरुवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंदिर समितीकडून जिल्हाधिकारी व शासनाकडे यात्रेसंदर्भातील सूचना जाणार आहेत. यामुळे मंदिर समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----

पालखी सोहळा वृद्धांसाठी मोठा उत्साही स्रोत आहे. गतवर्षी महामारीमुळे पालखी सोहळा पायी थांबविल्याने मोठ्या परंपरेच्या आनंदावर विरजण पडले. मात्र, यावर्षी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पायी पालखी सोहळ्याची परंपरा यावर्षी जपण्याची आवश्यकता आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मापुरी.

----

सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामाचा मान नातेपुते शहराचा असतो. शेकडो भाविकांना या सोहळ्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षा असते. मात्र, यावर्षी लसीकरण व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आषाढी पायी वारी व्हावी.

- बी. वाय. राऊत, माजी सरपंच नातेपुते.

---

पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगणाचा मान पुरंदावडे रिंगण सोहळ्याला मिळत होता. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांची वर्दळ असते. याशिवाय त्यामुळे शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या भाविकांचा शिणवटा जाऊन प्रचंड ऊर्जास्रोत म्हणून पाहिले जाते. ही परंपरा कोरनामुळे थांबली आहे. यंदा ही वारी होणे आवश्यक वाटते.

- देवीदास ढाेपे, सरपंच पुरंदावडे.

----

वारी हा महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सध्याची कोरोनाची स्थिती व वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. पालखी महामार्गावरील ग्रामपंचायतीचे दोन वर्षांचे अनुदान शासनाकडे थकले आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता व्हावी ही अपेक्षा आहे.

- शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपसरपंच, अकलूज.

---

कोरोनाची साथ आहे हे खरे असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. बंदोबस्तामध्ये जनभावनेचा विचार करून मोजक्याच भाविकांसह परंपरेप्रमाणे पालखी सोहळा चालत होणे गरजेचे आहे.

- विमलताई जानकर, सरपंच, वेळापूर

---

भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे पालखीचा मुक्काम असतो. भंडीशेगाव व वाखरीजवळ गोल रिंगण होते. हा सोहळा गतवर्षी पाहायला मिळाला नाही. कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण कमी झाले तर आषाढी यात्रेचा सोहळा मोजक्या भाविकांत होण्यास काही हरकत नाही.

- मनीषा यलमार, सरपंच, भंडीशेगाव.

----

कमी लोकांमध्ये का होईना सोहळा व्हावा

गतवर्षी कोरोनाचे संकट नवे होते; परंतु सध्या परिस्थिती सुधारलेली आहे, यामुळे सोशल अंतर ठेवून आषाढी यात्रेचा सोहळा कमी लोकांमध्ये तरी झाला पाहिजे. परंपरेचा हा सोहळा आहे. मानाच्या पालख्यासह किमान ५०० वारकऱ्यांना पायी चालत येण्याची परवानगी देण्यात यावी. पालखी सोहळे गावापासून दोन ते तीन किलोमीटर थांबले तरी गर्दी होणार नाही, अशा भावना पंढपूरच्या आंबेकर-आजरेकर फडाचे मठाधीपती ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांनी व्यक्त केल्या.

----

मानाच्या पालख्यांना पायी यात्रा करु द्या!

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. आषाढी यात्रेनिमित्त मानाच्या सात पालख्यांना मोजक्या संख्येत पायी यात्रा करू द्यावा, अशी मागणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर महाराजांनी केली आहे.

----

Web Title: Palkhi Marg Asusala for Vithumauli's visit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.