‘पल्याडवासी’ १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होणार, पारधी समाजाच्या जीवनावर टाकला प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:50 AM2017-12-05T11:50:41+5:302017-12-05T11:53:38+5:30
पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
समाजातील उपेक्षित घटक म्हणून पाहिला जात असलेला पारधी समाज अजूनही प्रगतीच्या वाटेवर आलेला नाही़ त्यांच्यावर सतत चोरीचा आरोप होतो़ हा डाग या प्रबोधनात्मक चित्रपटातून पुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे़ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण उस्मानाबाद जिल्ह्यात झाले असून आजपर्यंत २७ विजयी पुरस्कारांसह एकूण ७९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत़ या चित्रपटाची निर्मिती प्रगती कोळगे, सुमन बाबुराव कोळगे यांनी केली आहे़ कथा-पटकथा आणि संवादलेखनही त्यांनीच केले आहे़ अनिकेत खंडागळे यांनी छायाचित्रण केले आहे़ जयभीम शिंदे यांचे संगीत आहे़ धनंजय तांदळे यांचे गीत आहे़ या चित्रपटात विश्वनाथ काळे, अभिषेकसिंह हरेर, सोहन कांबळे, विशाल देशमुख, प्रतीक हांगे, विशाल साखरे, कुणाल पवाप, मनोज यादव, आकाश बनसोडे, कार्तिक माने, मुकुं द जाधव, रविकिशन शर्मा, अलोक शिंदे, आकांक्षा बनसोडे यांनी भूमिका बजावल्या आहेत़ या पत्रकार परिषदेस आकाश बनसोडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते़
--------------------
त्यांना रोजगारही दिला
- प्रगती कोळगे यांनी पारधी समाजातील कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत असताना सहकलाकारांना रोजगार तर मुख्य कलाकारांना मानधन देऊन चित्रपट बनवावा लागल्याचा अनुभव सांगितला़ चित्रपट नसता तर हेच कलाकार त्या दिवशी रोजगारासाठी बाहेर पडले असते़ त्यामध्ये त्यांची उपजीविका थांबू नये म्हणून साºया पातळ्यांवर त्यांच्याशी जोडून घेत जावे लागल्याचे त्या म्हणाल्या़ कथा-पटकथा साकारण्यात अडीच महिने गेले तर शुटिंगच्या पूर्वतयारीत दीड महिना गेला़ आॅडिशन घेतानाही एक प्रकारची परीक्षाच दिग्दर्शकांना द्यावी लागली़ उत्कृष्ट तंत्रज्ञान, साधनांचा वापर करत असताना कुठेही हात आखडता आणि संकुचित वृत्ती बाळगली नसल्याच्या त्या म्हणाल्या़
पारधी समाज हाच चित्रपटाचा आत्मा
- कथेचा समाज जो केंद्रबिंदू होता त्या समाजातील गायक निवडताना त्यांना सूर ना ताल, ना गाण्याचा गंध़ त्यांची तयारी करून गायनाला एका साच्यात आणत असताना स्वत:ला एक वेगळी परीक्षा द्यावी लागली़ हा प्रयत्न म्हणजे आयुष्यातला एक वेगळा प्रयोगच होता़ समाजात वाढत असताना अवतीभोवती या समाजाच्या समस्या, वेदना यांची सामाजिक जाणीव होत होती़ म्हणून पारधी समाज हाच चित्रपटाचा आत्मा ठरला़