सिद्धेश्वर देवस्थानचे पंच शे. दे. पसारकर यांचे निधन; वीरशैव साहित्यातील ज्ञानसूर्य हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:20 AM2021-02-25T10:20:28+5:302021-02-25T10:20:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच, प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक, संगमेश्वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८) यांचे काल बुधवारी दि. २४ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा हे त्यांचे मूळ गाव होते. आज गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पसारकर यांना कै. नागप्पा काडादी यांनी संगमेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत घेतले. याचा उल्लेख ते खूप वेळा करत असत. एक अभ्यासु व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून अशी त्यांची ख्याती होती.
श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. सरांनी त्यांच्या मूळ गावी केकतउमरा येथे स्वखर्चाने त्यांच्या आईच्या नावाने प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाची सोय करून दिली.
पासरकर यांनी वीरशैव मराठी साहित्याध्ये मोलाची भर घातली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वीरशैव मराठी अभंगगाथा भाग एक हा ग्रंथ नुकताच पूर्ण झाला होता. त्यांच्याकडे काव्यप्रतिभा होती. ओवी, अभंग, अनुष्टुभ अशा विविध छंदांमध्ये ते सहजपणे लेखन करीत असत.
संशोधन आणि साहित्य निर्मिती या दोन्ही मध्ये त्यांनी अनमोल अशी कामगिरी केली. त्यांच्या या महान कामगिरीबद्दल काशी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालय येथे त्यांना 'शिवकवी' हा काशीपीठाचा पुरस्कार देऊन गौरविले होते. काशी जगद्गुरुंनी वीरशैव साहित्यातील ज्ञानसूर्य हरपला. एका युगपुरुषाला आपण मुकलो आहोत अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.