आषाढी वारीनंतरची पंढरी; दोन दिवसांत २१० टन कचरा उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:51 PM2019-07-15T14:51:36+5:302019-07-15T14:54:50+5:30
नगरपालिकेच्या १२५० कर्मचाºयांनी बजावली सेवा; शहर होतंय चकाचक
पंढरपूर : आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी नगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, शनिवारी ९० तर रविवारी १२० असा २१० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून १० ते १२ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. ते वाखरी, रेल्वे स्टेशन, टाकळी, कासेगाव रोड, ६५ एकर परिसरासह शहरातील अन्य मोकळे मैदान, मठ, नागरिकांच्या घरात मुक्कामी होते़ यामुळे कचराकुंड्यांत शिळे अन्न, पत्रावळ्या मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच यात्रा कालावधीत अनेक छोटे-छोटे व्यापारी व्यवसाय करत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या.
शहरात लाखो भाविकांची गर्दी असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर गर्दी होती़ त्यामुळे वाहनांना शहरातील रस्त्यांवरुन ये-जा करता येत नव्हते़ यामुळे अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे साचले होते. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी रात्री कचरा उचलण्याचे काम करत होते, मात्र गर्दीच्या ठिकाणी कचरा उचलता येत नव्हता.
साठलेल्या कचºयामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने २४ तासांची स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. यामुळे दररोज शहरातून ९० टन कचरा उचलला जात आहे.
वाळवंटात विशेष स्वच्छता राहावी म्हणून पंढरपूर नगरपरिषद व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. वाळवंटात उघड्यावर शौचास बसू नये म्हणून विशेष टीम नेमण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट व जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले. ही मोहीम तीन-चार दिवस चालणार आहे.
अशी आहे यंत्रणा
- ५५ घंटागाड्यांद्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम चालू आहे. शहरात कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ८ वाहने, ८ टिपर, २ कॉम्पॅक्टर, ३ डम्पर प्लेसर, ५ डंपिंग ट्रॉली, ७० कंटेनरमार्फत दररोज ९० ते १२० टन कचरा उचलण्यात येत असल्याचे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी सांगितले.
६५ एकर परिसरातही स्वच्छता सुरु
- ६५ एकर परिसरात एकूण ४८७ प्लॉट भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. संपूर्ण ६५ एकरमध्ये लाखो भाविक मुक्कामी असल्याने या भागात कचरा साठला होता. जसे दिंड्या प्लॉट सोडून जातील, तसे कचरा उचलण्याचे काम सुरु असल्याचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले.
पंढरपुरात मोठ्या प्रमाणात मठ, वाडे, धर्मशाळा असल्याने त्या ठिकाणीही कचरा साठत होता. त्यामुळे २४ तासांत जमेल त्या पद्धतीने कचरा उचलण्याचे काम नगरपरिषदेचे कर्मचारी करत आहेत़ अनेक मठांत दिंडीप्रमुख, पालखीप्रमुख, विश्वस्त निवासी होते़ त्या मठांतील महाराज मंडळींनी शहरात स्वच्छता अभियान राबवावे़
- सचिन ढोले,
प्रांताधिकारी.