तिच्या मना भावली पंढरी, ‘मुखा’वरच ‘पांडुरंग’ विठ्ठल जय हरी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 03:12 PM2020-07-02T15:12:10+5:302020-07-02T15:13:47+5:30
वेगळी भक्ती; सोलापुरातील मुलीने रेखाटले चेहऱ्यावर विठ्ठलाचे रूप
सुजल पाटील
सोलापूर : लाखो वारकऱ्यांची मायमाऊली असलेल्या पंढरीच्या विठोबाचे दर्शन कोरोनामुळे यंदा होऊ शकले नाही़ भक्तगण वारकरी घरोघरी विठ्ठलाचा नामजप करत दर्शनाची भूक भागवून घेतली. तर काहींनी रांगोळी, चित्र, डिजीटल पेटींग, मातकाम, फुलांच्या सजावटीतून विठ्ठल साकारले. सोलापुरातील रसिका शहा हिने मात्र आपल्या चेहऱ्यांवर अॅक्रॅलिक कलरमध्ये विठूरायाचे लोभस रूप रंगवून स्वत:च्या दर्शनाची भूक भागवून घेत इतरांनाही दर्शन दिले.
आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठ्ठल-रूक्मिणीचा जयघोष होत असताना सोलापूर शहरातील संगमेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिंनी रसिका मनीष शहा हिने स्वत: दोन तास आरशात पाहून विठ्ठलाचे रूप आपल्या चेहºयावर साकारले़ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाची प्रतिकृती चेहऱ्यावर काढण्यास सुरूवात केली, दुपारी साडेबारा वाजता विविध रंगाचा वापर करून विठ्ठलाचे अत्यंत लोभस रूप आपल्या चेहºयावर साकारले़ रसिका हिने प्राथमिक शिक्षण ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झाले़ महाविद्यालयीन शिक्षण ती संगमेश्वर महाविद्यालयात घेत आहे.
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या रसिकाने आजपर्यंत विविध चित्रे साकारली आहेत. रसिकाने साकारलेल्या चित्रामधून सामाजिक संदेश, जनजागृती, भक्ती, सेवा, ग्रामीण जीवन, निसर्ग, शेतशिवार, संगीत आदी विषयावर चित्रे साकारून लोकांची वाहवा मिळविली आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्यावर साकारलेलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातील भक्तांनी गर्दी केली होती, एवढेच नव्हे तर काहींनी तर तिच्या चेहऱ्यावर साकारलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन समाधान मानले.
----------
अडीच तासात साकारली विठ्ठलाची प्रतिकृती...
रसिका शहा म्हणते की, आषाढीनिमित्त विठ्ठलाचे रूप आपल्या चेहऱ्यावर साकारण्यासाठी मी प्रथमत: वडील मनिष शहा व आईची परवानगी घेतली. सकाळी फे्रश झाल्यानंतर चहा घेऊन सकाळी दहा वाजता सर्व रंग सोबत घेऊन आरशासमोर बसले विठ्ठलाचे हुबेहुब चित्र साकारताना व प्रत्येक रंग चेहऱ्यावर भरताना मनातल्या मनात हरिनामाचा जप करीत होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे चित्र साकारले. जे जे कोणी ही चेहºयावरील विठ्ठलाची प्रतिकृती पाहिली त्या सर्वांनी चक्क जय हरी नामाचा गजर करीत दर्शन घेतले.
--------------
आषाढी एकादशीनिमित्त सकाळी मनात आलं की आपल्या चेहऱ्यावर विठ्ठलाचं रूप साकारावं. त्यामुळे मी अडीच तासात माझ्या स्वत:च्या चेहऱ्यावर आरशात पाहून विठ्ठलाचे चित्र साकारले़ मला चित्रकलेची खूप आवड आहे, मी याच क्षेत्रात करिअर करणार आहे. बारावीनंतर मुंबई येथील जे़ जे़ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पुढील शिक्षण घेणार आहे़ मला माझ्या वडिलांसह आई व कुटुंबातील सर्वांचीच मोठी मदत झाली़
- रसिका मनिष शहा,
चित्रकार, सोलापूर