पंढरीत ‘शिवपुत्र संभाजी’ ऐतिहासीक नाट्यप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:27+5:302021-02-11T04:24:27+5:30
महाराजा शंभूछत्रपती प्रॉडक्शन, पुणे निर्मित, महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते खा. ...
महाराजा शंभूछत्रपती प्रॉडक्शन, पुणे निर्मित, महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते खा. अमोल कोल्हे हे साकारणार आहेत. लॉकडाउननंतर राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अभिजीत पाटील म्हणाले की, कोरोना महामारीवरील लसीकरणाची जोमाने सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसात सामान्य माणसांनाही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वकाही आता अनलॉक होत आहे. कोरोनामुळे नाट्य प्रयोगांवर बंदी होती.
परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दि. १९ फेब्रुवारी जयंतीनिमित्त येथील हॉटेल विठ्ठल कामतसमोरील चंद्रभागा मैदानावर दि. २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे.
या महानाट्यामध्ये ३५० कलाकारांसह स्थानिक १५० कलाकारांचा सहभाग राहणार आहे. घोडे, लढाया असे अनेक जिवंत देखावे व ऐतिहासिक प्रसंग दाखवले जाणार आहेत. या महानाट्याचे आजपर्यंत १९४ प्रयोग झाले आहेत. पाच वर्षे वयोगटाच्या वरील लहान मुले, महिला, शासकीय अधिकारी, फॅमिली यांच्यासाठी बसण्याकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रतापगड, रायगड, सिंहगड असे विविध प्रकारच्या पाच गेटमधून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत ६ बाय ६ फुटावर खुर्च्या टाकून आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज किमान २० हजार प्रेक्षक या महानाट्याचा प्रयोग पाहु शकणार आहेत.
यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, लेखक महेंद्र महाडिक, महेश पवार आदी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::
छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य राखले, वाढवले. त्याच प्रमाणे आपणही स्वराज्याचे शिलेदार आहोत. या जाणिवेतून स्वराज्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वांना या महानाट्याचा प्रयोग पाहण्यासाठी मोफत प्रवेश राहणार आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील युवकांसह नागरिकांनी हे ऐतिहासिक महानाट्य पाहण्यासाठी आर्वजून यावे.
अभिजित पाटील
चेअरमन, डिव्हीपी उदयोग समूह