सिद्धेश्वर यात्रेत पंढरपूर-आळंदी पॅटर्न; मंदिर परिसरात संचारबंदी लागू होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:40 PM2021-01-07T14:40:54+5:302021-01-07T14:40:59+5:30
शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा : शहरवासीयाची उत्सुकता शिगेला
सोलापूर : शहरात होणाऱ्या श्री सिद्धेश्वर यात्रेत पंढरपूर-आळंदी पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता असून, मंदिर परिसरात संचारबंदी लागू होईल असे बोलले जात आहे. यात्रेबाबत पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आराखडा पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप शासनाचा आदेश आला नसल्याने सर्वांना याची उत्सुकता लागून राहिली आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या सार्वजनिक उत्सव-यात्रावर बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यात्रेबाबतचा आपला आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन्ही आयुक्तांचा आराखडा व जिल्हा प्रशासनाची आराखडा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठवून दिला आहे. विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र शासनाचा आदेश का येतो याची प्रतीक्षा सध्या सर्वांना लागून राहिले आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून पाठविलेल्या आराखड्यात यात्रेच्या पहिल्या दिवसापासून होमहवनपर्यंत होणाऱ्या सर्व विधींसाठी ५० लोकांची मर्यादा दिली आहे. शहरातून काठ्यांची मिरवणूक काढता येणार नाही. यात्रेच्या पहिल्या दिवशी हिरेहब्बूच्या वाड्यातून निघणाऱ्या मनाच्या काठ्या वाहनांमधून थेट मंदिरात येतील. मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्ये विधी पार पडतील. होमहवन त्यादिवशी मंदिरातून काठ्या होम मैदानवर जातील आणि तेथील विधी पार पडेल, असा आराखडा पाठविल्याचे समजते. वास्तविक पाहता वेळ खूप कमी राहिला आहे. त्यामुळे यात्रा होणार की नाही याबाबत अद्याप तर्कवितर्क लढविले जात आहे. असे जरी असले तरी सोलापुरात पंढरपूर आळंदी पॅटर्न राबवून मंदिर परिसरात संचारबंदी लागू केली जाईल, असेही बोलले जात आहे.
मांढरदेवी यात्रा रद्द, सिद्धेश्वर यात्रेचे काय?
- साताऱ्यातील प्रसिद्ध मांढरदेवी यात्रा रद्द करण्यात आली असून, तसा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेत तर काय होणार? अशी चर्चा सर्वसामान्य व्यक्तींमधून व्यक्त केली जात आहे.