पंढरपूर विधानसभा निवडणूक; भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 07:42 PM2021-03-28T19:42:39+5:302021-03-28T19:42:47+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस, मोहिते-पाटील यांच्यासह बडे नेते उद्या राहणार हजर
पंढरपूर : अखेर ठरलं. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला. मंगळवारी समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्हयातील बडे नेते हजेरी लावणार आहेत.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भालके विरुद्ध आवताडे असा सरळ सामना रंगणार आहे. एकास एक उमेदवार समोर असल्याने भाजपाने सहानुभूतीच्या लाटेतही महाविकास आघाडी समोर तगडे आव्हान उभे केले आहे.
पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी 2014 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास 60 हजार मते पडली होती.
समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. या पोट निवडणुकीत भाजपा कडून आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी परिचारक यांना थांबविण्यात यश मिळविले आहे. आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे याना पाठिंबा देण्याचे मान्य करत पंढरपुर शहरासह 22 गावांतून मताधिक्य देण्याचा शब्दही पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळेच आवताडेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेना व स्वाभिमानीने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षासह अभिजित बिचकुलेसारखे अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.
मंगळवारी आवताडेंसाठी मोठे नेते पंढरपुरात..
परिचारक अन् आवताडे यांचे मनोमिलन करण्यात यश मिळाल्यानंतर आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजा राऊत यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. ज्या हॉलमध्ये अजित पवार अन् जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, तिथेच भाजपचा मेळावा होण्याचीही शक्यता आहे. ते बुकिंग केल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.