गुजरातमधून पंढरपुरात येतात विक्रीसाठी बत्ताशे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:57 PM2019-06-29T14:57:50+5:302019-06-29T15:02:14+5:30
दर्शनानंतर भाविकांची पसंती प्रसादाला; चुरमुºयाबरोबर बत्ताशे अन् साखरफुटाणेही मागतात
प्रभू पुजारी
पंढरपूर : हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी विविध पालखी सोहळ्यांसह दिंड्यांमधून राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने येत आहेत. आषाढी एकादशीदिवशी वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतात. त्यानंतर त्यांची पहिली पसंती प्रसाद म्हणून चिरमुºयाबरोबरच बत्ताशे, साखर फुटाणे घेण्याची असते़ वारकºयांच्या सोयीसाठी पंढरपुरात स्थानिक कारखान्यासह गुजरातमधूनही विक्रीसाठी बत्ताशे येतात, अशी माहिती दुकानदारांनी दिली.
पंढरीत मंदिर परिसर, महाद्वार चौक, चौफळा, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड या ठिकाणी मेवा, मिठाईची सुमारे ५०० पेक्षा जास्त दुकाने आहेत़ आषाढी वारी सोहळ्यात एका दुकानदारांकडून सरासरी ५ क्विंटलची उलाढाल होते़ एक क्विंटलचा बत्ताशेचा ४४०० रुपये दर आहे़ त्यामुळे ५०० दुकानदारांकडून किमान २० ते २२ लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती दुकानदार राजेंद्र खंडागळे यांनी दिली़
महाद्वार चौकात सोमनाथ कवठाळकर, संतोष गो़ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मेवा मिठाई उत्पादक सहकारी सोसायटी संस्था कार्यरत आहे़ या संस्थेतूनच स्थानिक व्यापारी बत्ताशे, साखर फुटाणे, कांडी, बुटा साखर होलसेल दरात खरेदी करतात़ पूर्वी पंढरपुरात केवळ दोन कारखाने होते; मात्र सध्या ६ ते ७ कारखान्यांमधून बत्ताशेसह अन्य प्रासादिक साहित्य बनविले जातात.
मेवा मिठाई उत्पादक सह़ सोसायटी संस्थेच्या कारखान्यास भेट देऊन बत्ताशे, साखर फुटाणे, कांडी हे बनविण्याची प्रक्रिया कशी असते, याची माहिती घेतली़ आषाढी वारी सोहळा काही दिवसांवर आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी सध्या कामगारांची बत्ताशे, साखर फुटाणे, कांडी बनविण्याची लगबग सुरू आहे़ रोज ५ टन माल बनविला जातो़ यासाठी ४ जोडपे काम करताना दिसून आले.
असे बनविले जातात बत्ताशे
- प्रथम कढईत पाणी ओतून ते गरम करावे़ उकळी येताच त्यात साखर ओतावी. त्यानंतर चाचणी करावी़ योग्य प्रमाण होत असल्याचे लक्षात येताच ती कढई उचलून घराच्या छताला बांधलेल्या दोरीला अडकवावी़ शिवाय त्या कढईला एक लाकडी दांडा असतो आणि एक लोखंडी खिळा असतो़ लाकडी दांडा खांद्याला लावून एका हाताने लोखंडी दांडा धरून दुसºया हाताने थोड्या लाकडाच्या साहाय्याने पाटावर तो साखरेचा पाक योग्य त्या प्रमाणात ओतावा़ त्यानंतर बत्ताशे तयार होतात़ थोडावेळ सुकविल्यानंतर ते गोळा करून कॅरेटमध्ये भरावेत़ अशा पद्धतीने बत्ताशे बनविले जातात़ यासाठी दोन कामगारांची आवश्यकता असते़ त्यामुळे शक्यतो पती-पत्नीच हे काम करीत असल्याचे दिसून येते़
पारंपरिक व्यवसायाची जोपासना
- साखरेपासून बत्ताशे, फुटाणे, कांडी तयार करण्याचे काम तसे कठीण आहे़ मात्र पारंपरिक व्यवसायाची जोपासना करायची म्हणून तो करतो़ कारण वरील पदार्थ बनविण्याचे काम खूपच अवघड असते़ सतत उष्ण ठिकाणी थांबावे लागते़ शिवाय थोडा जरीही हलगर्जीपणा करून चालत नाही़ वेळेवर वरील पदार्थ बनवावे लागतात़ उकळलेली साखर कढईत थंड झाली तर नुकसान होते, असे येथील कामगारांनी सांगितले़
साखरेची कांडी बनविण्याची प्रक्रिया
- मोठ्या कढईत पाणी ओतून ते गरम करावे़ उकळी आल्यानंतर साखर ओतावी़ नंतर चाचणी करून योग्य प्रमाण होताच त्याचा मोठा गोळा तयार करावा़ तो गोळा मशीनमध्ये घालावा़ मशीनमध्ये तो लांब होत पुढे त्याचा आकार छोटा होतो़ ते एका पाटावर अंथरावे़ त्यानंतर त्याचे तुकडे करावेत म्हणजे कांडी तयार होते़