पुंडलिक वरदे... सोन्याच्या पंढरीतील विठ्ठलासाठी आता सोन्याची वीट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:54 AM2018-03-22T10:54:53+5:302018-03-22T11:00:35+5:30
पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठावीस युगे उभा असणाऱ्या विठूरायाच्या खजिन्यात आता सोन्याची वीट जमा होणार आहे.
पंढरपूर : सर्वसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेला पंढरपूरचा सावळा विठुराया आता सोन्याच्या विटेवर उभा राहणार आहे. विठूरायाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. यामध्ये देवाच्या पारंपरिक दागिन्यांचा समावेश नसून, देवाचे हे सर्व शेकडो अनमोल दागिने खजिन्यातच राहणार आहेत. भक्तांनी अर्पण केलेलं हे सर्व सोनं वितळवून विठूरायासाठी सोन्याची वीट बनवण्यात येणार आहे.
आषाढी- कार्तिकी विसरू नका, मज देव गुज सांगतसे ! या अभंगाप्रमाणे पांडुरंग हा भक्तीचा अन् भक्तांचा भुकेला आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी वर्षाला देशभरातून दीड कोटींपेक्षा आधिक भाविक येत असतात. हे विठ्ठल भक्त अनेक दान विठूचरणी अर्पण करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठलाचरणी दान करण्यात आलेलं सोने वितळवून वीट बनवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
काल याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. 2015 मध्ये राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानूसार देवस्थानाला भेट म्हणून अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंबाबत सूचना दिल्या होत्या. आता याचाच आधार घेऊन मंदिर समितीने देवाच्या खजिन्यात असलेल्या 25 किलो सोने आणि 830 किलो चांदीच्या वस्तू वितळवून, त्याच्या विटा बनविण्यावर विचार सुरु केला आहे.