चैत्र वारीसाठी पंढरपुरात दीड लाख भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:29 PM2018-03-27T12:29:53+5:302018-03-27T12:29:53+5:30
चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची गर्दी
प्रभू पुजारी
पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन चैत्र वारीसाठी राज्याच्या कानाकोपºयातून दीड लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत़
श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग ७ वाजेपर्यंत विप्र दत्तघाटापर्यंत गेली होती़ मात्र मंदिर समितीने उभारलेले पत्राशेड रिकामेच होते़ त्यामुळे दर्शनासाठी भाविकांना केवळ ८ ते १० तास लागत असल्याचे दिसून येते़ भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत चटई टाकली होती तर उन्हापासून संरक्षणासाठी खांब उभारून मंडप टाकून सावलीची सोय केली होती़
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ वारीनंतर चैत्र वारी असते़ या वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक पंढरीत दाखल होत आहेत. भरउन्हात डोक्यावर रुमाल किंवा टॉवेल टाकून, काखेला किंवा पाठीला अडकविलेली बॅग़़़, हाती भगवा झेंडा घेऊऩ़़ मुखी विठुनामाचा जयघोष करीत़़़ झपाझप पावले टाकत अनेक जण चिमुकल्यांसह महिला, पुरुष मंदिराच्या दिशेने निघाले होते़ त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यांसह अन्य मठातही भाविकांची वर्दळ होती़ जे भाविक दाखल झाले ते मात्र मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, कीर्तनात रंगले होते़
शिवाय काही भाविक चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी जात होते, मात्र पाणी कमी असल्याने काही भाविक त्यातच स्नान करून आणि काही भाविक केवळ हात, पाय व तोंड धुऊन विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जाताना दिसून आले़
६५ एकर परिसर रिकामाच
- ६५ एकर परिसरात आषाढ, कार्तिक व माघ वारीत मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ किमान एक लाख वारकºयांची सोय या परिसरात केली जाते, मात्र चैत्र वारीसाठी सध्या या परिसरात केवळ २० दिंड्या दाखल झाल्या आहेत़ एकूण ५२ प्लॉट केले असून, या परिसरात २० ते २२ हजार भाविक दाखल झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ आलेल्या भाविकांसाठी नळाद्वारे पाण्याची सोय, तात्पुरते शौचालय, विजेची सोय, चोख पोलीस बंदोबस्त, अग्निशमन गाडी आदी सोयी-सुविधा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत़
पाण्याअभावी भाविकांचे हाल
- चैत्र वारीसाठी पंढरीत आलेले भाविक प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करून, भक्त पंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर दर्शनरांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतात़ मात्र चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसल्याने भाविकांचे हाल होताना दिसून आले़ काही भाविक डबक्यातील पाण्यालाच पवित्र मानून स्नान करीत होते तर काही जण केवळ हातपाय, तोंड धुऊन दर्शनासाठी निघत होते़ वारीसाठी प्रशासनाने पाण्याचे नियोजन न केल्याने श्रीमंत पवार, बाळासाहेब सुतार, युवराज मेंथे, तुकाराम मासाळ या भाविकांनी नाराजी व्यक्त केली़