पंढरपूर, मंगळवेढा शहराने केला राष्ट्रवादीचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:56+5:302021-05-05T04:36:56+5:30
भाजपने परिचारक, आवताडेंचे ऐतिहासिक मनोमिलन घडवत दोघांमध्ये गेल्या दोन निवडणुकीत झालेली मतविभागणी टाळली, तरीही पंढरपूर शहर व २२ गावांतून ...
भाजपने परिचारक, आवताडेंचे ऐतिहासिक मनोमिलन घडवत दोघांमध्ये गेल्या दोन निवडणुकीत झालेली मतविभागणी टाळली, तरीही पंढरपूर शहर व २२ गावांतून सहानुभूतीच्या लाटेत भगीरथ भालके मोठे मताधिक्य घेतील, अशी चर्चा होती. समाधान आवताडे हे मंगळवेढ्याचे भूमिपुत्र असले, तरी त्या ठिकाणीही ते अपेक्षेप्रमाणे मताधिक्य न घेता, सिद्धेश्वर आवताडे यांच्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशाही चर्चा रंगल्या. मात्र, मतदारांनी वेगळाच कौल दिल्याचे चित्र दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार भारत भालके यांनी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या गावात मताधिक्य देत विजय सोपा केला होता. मात्र, यावेळी त्याच गावांनी घात केल्याने भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे.
पंढरपूर, मंगळवेढ्याच्या निर्णायक आघाडीमुळे आवताडे विजयी
पंढरपूर शहरात समाधान आवताडे यांना २२,९०८, भगीरथ भालके यांना २१,४३२ मते मिळाली. त्यामुळे पंढरपूर शहरात समाधान आवताडेंना १,४६७ मतांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. मंगळवेढा शहरानेही समाधान आवताडेंना १०,५५८ तर भगीरथ भालके यांना ६,२२१ मते मिळाली. त्यामुळे आवताडे या शहरात ४,३३७ चे मताधिक्य मिळाले. ग्रामीण भागाने मात्र राष्ट्रवादीला साथ दिली असली, तरी या दोन्ही शहरांत मिळालेल्या निर्णायक मताधिक्यामुळे भाजपच्या समाधान आवताडे यांचा निसटत्या मताने निर्णायक विजय झाल्याचे चित्र आहे. पंढरपूर तालुक्यातील कौठाळी, शिरढोण, इसबावी, वाखरी, गादेगाव, कासेगावात मागील निवडणुकीत स्व.भारत भालकेंना मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, या निवडणुकीत ते कायम न राहता ते मताधिक्य कमी झाले. त्याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला, तरीही काही गावांनी तारल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूक अटीतटीची झाली.
भालकेंचे गणीत पंढरपुरातच फसले
मागील तिन्ही निवडणुकांमध्ये पंढरपूर शहर व तालुक्याने स्व. भारत भालके यांना मोठे मताधिक्य दिले होते. २०१९च्या निवडणुकीत स्व. भारत भालके विरुद्ध स्व. सुधाकरपंत परिचारक असा सामना झाला. या निवडणुकीत परिचारकांनी केेलेल्या मोठ्या कामांमुळे त्यांना मताधिक्य मिळेल, असा अंदाज होता. मात्र, जायंट किलर म्हणून परिचित असलेल्या भारत भालके यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातून जवळपास ६ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत पंतांची डोकेदुखी वाढविली होती. हीच निर्णायक मतांची आघाडी भालकेंना मंगळवेढ्यात तारून घेत असे. या निवडणुकीतही या तालुक्यातून स्व. भालकेंची लोकप्रियता व सहानुभूतीची लाट, यामुळे ही आघाडी किमान दुप्पट होईल, असा अंदाज होता. मात्र, इथेच भगीरथ भालकेंचे गणित फसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील आघाडी राखता आली नाही, शिवाय समाधान आवताडेंनाच पंढरपूर तालुक्यातून निर्णायक आघाडी मिळाली. मंगळवेढा शहराने साथ दिल्याने अशक्यप्राय वाटणारा विजय सोपा झाला.