पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 08:57 PM2021-01-21T20:57:18+5:302021-01-21T20:57:31+5:30
आमदार रोहित पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोट निवडणूकीची उमेदवारी भालके यांना देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे शिफारस करणार का असा प्रश्न आ. रोहित पवार यांना विचारला. त्यावर ते म्हणाले उमेदवारी देताना सर्वे करून लोकांच्या मनातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाईल, परंतु भाजपाचे आमदार व अन्य दोन नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार संजय शिंदे, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक महेश कोठे, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, संजय घोडके यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, विठ्ठल कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी भालके यांना मदत करणार आहे, परंतु दिवंगत भारत भालके यांच्या जागेवर जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित करणार आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील असे स्पष्ट केले. मात्र पोटनिवडणुकीतील उमेदवारी संदर्भात भाजपचे काही आजी-माजी आमदार देखील संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज बिलाची ६५ हजार कोटी रुपये थकबाकी असून यामुळे राज्यावर आर्थिक ताण पडला आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक संकट असल्यामुळे व केंद्र सरकार मदत करणार नसल्यामुळे याबाबत सवलत देणे शक्य नसल्याचे अप्रत्यक्ष पवार यांनी कबुली दिली आहे.