पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक; अडीच हजार पोलीस १२ तास करणार बंदोबस्त
By appasaheb.patil | Published: April 14, 2021 04:55 PM2021-04-14T16:55:49+5:302021-04-14T16:56:30+5:30
१६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर असणार मोठा बंदोबस्त
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. संवेदनशील असणाऱ्या १६ मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी स्थानिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर निवडणूक आयाेगाने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी १६ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२१ रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, जमावबंदीचे आदेश लागू ठेवण्यात आले आहेत. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. कोरोनामुळे हे मतदान १२ तासांचे असणार आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत असणार असल्याचेही अतुल झेंडे यांनी सांगितले.
असा आहे पोलीस बंदोबस्त...
- पोलीस अधीक्षक - ०१
- अप्पर पोलीस अधीक्षक - ०१
- उपविभागीय पोलीस अधिकारी - ०६
- पोलीस निरीक्षक - ०८
- सहायक पोलीस निरीक्षक - ३२
- पोलीस कर्मचारी - ८०३
- होमगार्ड - ५५०
- वाहने - ६०
केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या ५ तुकड्या
पंढरपूर-मंगवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान व मतमोजणीसाठी केंद्रीय (सीआरपीएफ) व राज्य (एसआरपीएफ) दलाच्या पाच तुकड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. एका तुकडीत १०० असे एकूण ५०० जवान मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत. यातील काही जवान हे बंदूकधारी असणार आहेत. दरम्यान, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पंढरपूर-विधानसभा मतदान केंद्र व मतमोजणीसाठी ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त सज्ज ठेवला आहे. कोरोनामुळे यंदा मतदानासाठी १२ तासांचा वेळ देण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा आवश्यक तेवढा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त असणार आहे. राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिकांनी याकामी पोलिसांना सहकार्य करावे.
- अतुल झेंडे, प्रभारी पोलीस अधीक्षक, सोलापूर