निवडणुकीचा पंढरपूर पॅटर्न राज्यभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:22 AM2021-05-10T04:22:07+5:302021-05-10T04:22:07+5:30
राज्यात या तिघांना शह देण्याचा नवा फॉर्म्युला भाजपला मिळाला आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह ...
राज्यात या तिघांना शह देण्याचा नवा फॉर्म्युला भाजपला मिळाला आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राम सातपुते, विजयराज डोंगरे, जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आदी नेत्यांनी एकीने निवडणूक लढवत विजय खेचून आणल्याबद्दल त्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
भविष्यात राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये पंढरपूर पॅटर्न राबवत मत विभागणी टाळण्यासाठी भाजपच्या गटा-तटामध्ये मनोमिलन घडवत एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करून महाविकास आघाडीला नक्की हारवू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्येही पंढरपूर पोटनिवडणुकीप्रमाणे एकीचे दर्शन घडवू व अशक्यप्राय वाटणाऱ्या जागा नक्की खेचून आणू, असा सल्लाही त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिला आहे.
या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्य पातळीवरील भाजपच्या नेत्यांचे मनोबल उंचावले असून सोलापूर जिल्ह्यातील विविध अपूर्ण योजना, मंगळवेढ्याचे ३५ गावचे पाणी, सध्या वाढत असलेला कोरोना, सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी इंदापूरला नेण्याचा जो घाट घातला आहे, याबाबत आपण लक्ष घालून त्या त्या जिल्ह्याचे पाणी तेथील हक्काच्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, याबाबत आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढ्यात सापडला कोरोनाचा नवीन व्हायरस
सध्या कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. दररोज शेकडो नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. पंढरपूर-मंगळवेढ्यात निवडणुकीनंतर कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. अशातच आता पंढरपूर, मंगळवेढ्यात कोरोनाचा नवीन व्हायरस सापडल्याचा मुद्दा आमदार समाधान आवताडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुण्याच्या वैद्यकीय कंपनीशी दूरध्वनीवरून चर्चा करून हा व्हायरस चेक करून त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याची चर्चा केली. त्यानुसार त्या कंपनीचे अधिकारी येत्या काही दिवसात या दोन्ही तालुक्यात येऊन याची माहिती घेणार आहेत. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध होतो का, इतर आरोग्य सुविधा, रेमडेसिविर इंजेक्शन व कोरोनाबाबतची माहिती घेऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या आहेत.