पंढरपूर पोलीस कोविड सेंटर ठरतंय सामान्य रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:17+5:302021-05-09T04:23:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोविडची लागण झाल्यानंतर प्रारंभी बेड उपलब्ध ...

Pandharpur Police Kovid Center to be 'Oxygen' for general patients | पंढरपूर पोलीस कोविड सेंटर ठरतंय सामान्य रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’

पंढरपूर पोलीस कोविड सेंटर ठरतंय सामान्य रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोविडची लागण झाल्यानंतर प्रारंभी बेड उपलब्ध होत नव्हते म्हणून महिला जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वीनी सातपुते यांच्या संकल्पनेतून पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी अवघ्या ३६ तासांत पंढरपुरात अत्याधुनिक सुविधांनीयुक्त राज्यातील पहिले कोविड सेंटर उभे केले आहे. त्यामुळे पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आता ‘ऑक्सिजन’ ठरत आहे.

दोन महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे पोलिसांवर कमालीचा ताण आहे. यावेळी पोलीस कर्मचारी सर्वसामान्यांसाठी २४ तास कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारीच कोरोनाबाधित होत आहेत. काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन बेड व इतर सुविधा उपलब्ध न झाल्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. भविष्यात पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने सुविधा मिळाव्यात, त्यांच्यासोबत इतर गरजू रुग्णांची सोय व्हावी म्हणून जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी राज्यातील पहिले पोलीस कोविड सेंटर पंढरपुरात अवघ्या ३६ तासांत सुरू केले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत यांनी सांगितले.

या कोविड सेंटरमध्ये ४२ ऑक्सिजन मशीन, सात मिनी व्हेंटिलेटर्स व हवेतून ऑक्सिजन घेऊन रुग्णाला देण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ७५० रुपये ऑक्सिजन व इतर सुविधा ७५० तर सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयातील खर्चाप्रमाणे माफक दर आकारून सुविधा दिल्या जात आहेत.

पंढरपुरातील अन्य खासगी रुग्णालयांच्या तुलनेत फक्त पाेलीस कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. सर्व यंत्रणा पोलीस वेल्फेअर फंडातून उभी केली आहे. आजपर्यंत तब्बल ११० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत स्पष्ट केले.

----

तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

पंढरपुरात कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उणीव भासू नये म्हणून जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पंढरपुरातील खासगी रुग्णालयाशी समन्वय साधून कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपलब्ध करून घेतला. त्यामुळे प्रत्येक आठ तासाला ८ नर्सेस, ३ तज्ज्ञ डॉक्टर याशिवाय दिवसातून तीनवेळा एमडी, एमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत. भविष्यात आणखी बेडसंख्या वाढविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे हे कोविड सेंटर अडचणीच्या काळात सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे.

-----

पोलीस कर्मचाऱ्यांचे होणारे हाल थांबविण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी हा प्रयोग साताऱ्यात राबविला होता. त्याच धर्तीवर पंढरपुरातही सुरु करुन अवघ्या ३८ तासांत रुग्णांवर उपचार सुरू झाले. भविष्यात आणखी ४० पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

- विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी

Web Title: Pandharpur Police Kovid Center to be 'Oxygen' for general patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.