विठ्ठल-रुक्मिणीचे 3 तास दर्शन बंद राहणार, शासकीय महापूजा होणार 70 मिनिटांत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 11:05 AM2018-07-22T11:05:59+5:302018-07-22T11:11:16+5:30
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.
पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. दोन्ही देवतांची महापूजा सुमारे 70 मिनिटे चालणार आहे. तत्पूर्वी मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते विठ्ठल, रुक्मिणीची पाद्यपूजा, नित्यपूजा होणार आहे. पाद्यपूजा, नित्यपूजा आणि महापूजेसह मंदिराची साफ, सफाईसाठी तीन तास दर्शन बंद राहणार आहे.
आषाढी एकादशीच्या (23 जुलै) दिवशी पहाटे 2 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस आणि मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. त्यानंतर पहाटे 3 वाजल्यापासून 3.30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा होणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी महापूजेचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी परंपरेनुसार विठ्ठल रुक्मिणीची पाद्यपूजा, नित्यपूजा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते होईल.
पाद्यपूजा, नित्यपूजा आणि शासकीय महापूजा विधीसाठी 3 तासांचा अवधी लागणार असून या दरम्यान विठ्ठल दर्शन बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात मंदिराची सफाई करण्यात येणार आहे. रात्री 9.30 ते पहाटे 1.15 वाजेपर्यंत दर्शन मंडपातील भाविकांचे दर्शन पूर्ण करून घेतले जाणार आहे. या दरम्यान दर्शन मंडपातील सफाई केली जाणार असून, पहाटे 3 वाजून 30 मिनिटांपासून विठ्ठल दर्शन सुरू करण्यात येणार आहे.