पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरू; सकाळी ९ वाजेपर्यत ६.४२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 10:51 AM2021-04-17T10:51:06+5:302021-04-17T10:51:31+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. कोरोनाच्या सावटाखाली पहिल्यांदाच मतदान होत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात ग्रामीण भागात संथगतीने तर शहरात उत्साहाने मतदार मतदानासाठी येत असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर तापमान चेक करून सँनिटायझरिंग करूनच मतदारांना आत सोडले जात आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ६. ४२ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे अवघ्या दीड वर्षात पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. कोरोनाचे सावट असले तरी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले होते. त्यानुसार नागरिक मास्क, सोनिटायझर चा वापर करून मतदानासाठी बाहेर पडत आहेत. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गादेगाव, वाखरी, कौठाळी, शिरढोन, कोर्टि, खर्डी, बोहाळी, कासेगाव, गोपाळपूर, आदी प्रमुख २२ गावामध्ये कुठं उत्साहात तर कुठं संथगतीने मतदान सुरू होते. पंढरपूर शहरातील काही मतदान केंद्रावर मात्र सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा पाहवयास मिळाल्या.
मतदानासाठी प्रसासनाकडून कर्मचाऱ्यांना पुनवेळ किंवा दोन तासांनी सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे ११ वाजल्यानंतर अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडतील असा अंदाज व्यक्त होत आहे.