प्रदक्षिणा मार्गावर सरकता उड्डाणपूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:37 AM2024-11-08T10:37:33+5:302024-11-08T10:37:53+5:30
Pandharpur Wari: कार्तिकी यात्रेत भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून प्रदक्षिणा मार्गावर सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे.
पंढरपूर - कार्तिकी यात्रेत भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून प्रदक्षिणा मार्गावर सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे. यात्रेत प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन, तसेच भाविकांच्या सुविधेसाठी प्रथमच मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेची मुखदर्शन रांग श्री संत तुकाराम भवनच्या पाठीमागून छत्रपती संभाजी चौकापर्यंत असते. तथापि, छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपूल नसल्याने दर्शन रांग सुलभ व जलद गतीने चालविण्यास, तसेच प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे श्रींच्या मुखदर्शन रांगेत सरकता उड्डाणपूल उभा करण्यात आला आहे.
जास्त उंचीचा रथ आला, तर पूल सरकणार
३० फूट उंची व १० फूट लांबीचा सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला. यामधील १२ फुटांचा भाग सरकता असल्याने, एकादशीला प्रदक्षिणा मार्गावर रथांना अडथळा होणार नाही. १० फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येईल.