आता नाचत पंढरी जाऊ रे खेळीया; पुरंदावडे येथे माऊलींच्या पालखीचे रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:25 AM2022-07-06T07:25:42+5:302022-07-06T07:26:04+5:30
अकलूजमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण पार पडले.
सोलापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीचा पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सात तोफांची सलामी देऊन जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर अकलूज मधील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात पालखीचे गोल रिंगण पार पडले. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे रिंगण पार पडले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्व दुपारी २.१५ वाजता रिंगण मैदानावर पोहोचले, तर पालखी दुपारी २.४८ वाजता पोहोचली. पालखी रिंगण मार्गाला प्रदक्षिणा घालून मध्यभागी विसावली पादुकांची व अश्वाची पूजा मान्यवरांनी केली. देवीदास लोखंडे यांनी जरीपटक्यासह तीन प्रदक्षिणा मारल्या व ३.४८ वाजता रिंगण सोहळा सुरू झाला. दोन फेऱ्या मारत ४ वाजता अश्वांची दौड थांबली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पायी चालत सोहळ्यात सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समितीचे इतर पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन परंपरेप्रमाणे हे आमंत्रण दिले. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निमंत्रण देतानाच मुख्यमंत्री शिंदे यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार केला. पंढरपूर प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे केवळ २२ दिवसांच्या अंतराने दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना या महापूजेचे आमंत्रण देण्याची वेळ मंदिर समितीवर आली.
...अन् शिणवटा गेला..
रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यांमध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. रिंगण व उडीच्या कार्यक्रमानंतर श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा येळीव पाटी येथे विश्रांती घेऊन माळशिरस मुक्कामाकडे मार्गस्थ झाली.