पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 04:37 PM2021-11-08T16:37:26+5:302021-11-08T16:40:40+5:30
पालखी मार्गाचे भूमिपूजन; मोदीकडून राम कृष्ण हरीचा जयघोष..
पंढरपूर/सोलापूर - पालखी मार्गाच्या कामामुळे पंढरपूरसोबतच परिसरातील इतर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल. उद्योग, व्यवसायासोबतच धार्मिक पर्यटन वाढेल. पंढरपूरच्या विकासात लोकसहभाग वाढल्यास भविष्यात पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर धार्मिक तीर्थक्षेत्र नक्कीच बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पंढरपूरकरांकडून तीन गोष्टी व्यक्त केल्या. मोदी यांनी पंढरपूरकरांना सांगितले की, पालखी मार्गावरील पायी रस्त्याच्या बाजूला थंड सावली देणारे वृक्ष लावावे, पालखी मार्गावर ठीक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जावी अन् भविष्यात पंढरपुरला भारतातील स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे यासाठी काम करावे अशी आशा व्यक्त केली.
आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. आज या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंग, राज्यपाल भगतसिंह कोश्यािर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अन्य मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंढरपूरशी जोडण्याच्या उद्देशाने दोन रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (एनएच-९६५) पाच विभागांच्या चौपदरीकरणासाठी आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (एनएच-९६५ जी) तीन विभागांच्या चौपदरीकरणाचे त्यांनी भूमिपूजन केले. या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला 'पालखी' साठी समर्पित पदपथ तयार केले जातील, ज्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या पंढरपूर या यात्रेकरूंचा प्रवास सुकर करण्यासाठी हे प्रकल्प तयार करण्यात आल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.