शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील

By Appasaheb.patil | Published: November 18, 2022 01:11 PM2022-11-18T13:11:02+5:302022-11-18T13:11:19+5:30

शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर शहर व विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

Pandharpur will expand on the lines of Shirdi says Radhakrishna Vikhe-Patil | शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील

Next

सोलापूर : शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर शहर व विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतचा समावेश तयार करण्यात आलेल्या आराखड्यात विचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी वारकरी भाविकांना व स्थानिक नागरिकांना केंद्रविंदू मानून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची रचना करण्यात आली असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच व्यापार संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, वीर महाराज व स्थानिक व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री  विखे पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारुप आराखडा करताना भविष्यात होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेवून करण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत  करण्यात येणारी कामे ही स्थानिक नागरिक व वारकरी, भाविकांच्या  निदर्शनास आणून व विश्वासात घेवूनच करण्यात येणार आहेत. शहरात एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पंढरपूर शहरालगतच्या परिसराचाही विकास करुन त्या ठिकाणी भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. वारकरी सांप्रदायाच्या परंपरेला व संस्कृतीला धक्का न पोहोचता विकास कामे करण्यात येणार आहेत.

१५ दिवसात प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करा...स्थानिक व्यापारी, नागरिक व वारकरी यांनीही विकास आराखडा १५ दिवसांत प्रशासनाकडे सादर करावा. प्रशासनाने तयार केलेला आराखडा आणि स्थानिक नागरिकांनी केलेला आराखड्याबाबत एकत्रित विचार करुन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. कॉरिडॉरबाबत व्यापारी व नागरिकांनी भीती बाळगू नये. बाधित नागरिक व व्यापारी यांच्या भविष्याचा विचार करुनच जास्तीत जास्त मोबदला देण्यात येईल, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नागरिक यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करताना स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार व्हावा, असे सांगितले.

Web Title: Pandharpur will expand on the lines of Shirdi says Radhakrishna Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.