Pandhrpur Wari; ६५ एकरातील ४८० प्लॉटमध्ये दिंड्या, एकाच ठिकाणी दोन लाख भाविकांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 08:32 PM2022-07-09T20:32:00+5:302022-07-09T20:32:08+5:30
वैष्णवांचा महामेळा : २ हजार स्वच्छतागृहे अन् तीन वैद्यकीय उपचार केंद्र
पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक व वारकरी संप्रदाय पंढरीत येत असतात. ६५ एकर परिसरात ४८० दिंड्यांचे प्लाॅट बुक झाल्याने सध्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी गजबजून हाऊसफुल्ल झाले आहे. या ६५ एकरात सुमारे दोन भाविकांची सोय झाली आहे.
आषाढी एकादशीसाठी आलेल्या वारकऱ्यांना प्रशासनाने ६५ एकर जागेवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या रविवारी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथे भाविकांचा ओघ वाढला आहे. यामध्ये तंबू, राहुट्या उभारण्यासाठी स्वतंत्र प्लाॅट, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, तात्पुरते स्वच्छतागृहे , अंतर्गत रस्ते, कायमस्वरूपी स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६५ एकरांमध्ये वारकऱ्यांसाठी एक-एक गुंठ्यांचे ४८० प्लाॅट असून दिंड्यांनी बुक झाले आहेत. या दिंड्यांबरोबर येणाऱ्या दोन लाख वारकऱ्यांच्या निवासाची सोय येथे होणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
...................
आषाढीत प्राथमिक आरोग्य केंद्रच्या सुविधा
आषाढीवारी यात्रेसाठी प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्र तीन ठेवण्यात आले आहेत. यामध्ये १८ डॉक्टर, १०८ च्या ४ ॲम्बुलन्स, ४ असणार आहे. या ॲम्बुलन्समध्ये ओपीडीची सुविधा असून ६५ एकर परिसर १, नामदेव पायरी १, पत्राशेड दर्शनबारी १, पंढरपूर कॉटेज हॉस्पिटल १, वाळवंट परिसर १, अशी व्यवस्था आहे.
................
वारकऱ्यांसाठी ६५ एकर सुविधांनी सज्ज
दिंड्यांकरिता ४८० प्लाॅट, शौचालय स्वच्छतागृहे २ हजार, प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्र ३, अग्निशमन १, रुग्णवाहिका १, सफाई कर्मचारी ७०, फवारणी कर्मचारी १०.
...................
पोलीस प्रशासन तैनात
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आली. २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५० पोलीस उपनिरीक्षक, ११ महिला पोलिस अधिकारी, राज्य राखीव दलाची १ तुकडी, २ बॉम्बशोधक व नाशक पथके, वाहतूक व्यवस्थेसाठी २ पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस कर्मचारी व १५० पोलीस कर्मचारी गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र पथक अशी पोलीस यंत्रणा यात्रेसाठी नियुक्त करण्यात आली आहे.