Pandhrpur Wari; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; एकनाथ शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर
By Appasaheb.patil | Published: July 9, 2022 08:54 PM2022-07-09T20:54:03+5:302022-07-09T20:54:23+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; पंढरपुरात १० लाख भाविक दाखल
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : यंदा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरातील प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज सायंकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून कारने पंढरपुरात दाखल होणार आहेत. रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी उपस्थिती. त्यानंतर पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन. पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती. सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती. दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण करणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले आहेत, ते पंढरपुरात आल्यानंतर नियोजित कार्यक्रमात बदल सुध्दा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आहे. सध्या जिल्ह्यात नगरपरिषदा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौर्यात विविध अटी व शर्थी लादले आहेत असे सांगण्यात आले.