Pandhrpur Wari; काय हा रिंगण... काय हा पाऊस... काय ही गर्दी..सगळे ओकेच हाय की...
By Appasaheb.patil | Published: July 9, 2022 08:37 PM2022-07-09T20:37:48+5:302022-07-09T20:38:02+5:30
आषाढी वारीतील संवाद- पावसाच्या सरीने चिंब झाले वारकरी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : काय हे रिंगण.. काय हा पाऊस... काय ही गर्दी... असा एकमेकांशी संवाद साधणारे अनेक वारकरी शुक्रवारी भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील पालखी तळावर पाहावयास मिळाले. निमित्त होते रिंगण सोहळ्याचे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आमदार शहाजीबापू पाटील यांचा संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संवादाची भुरळ आषाढी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या तोंडी शुक्रवारी ऐकावयास मिळाला.
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे उभे रिंगण पार पडणार होते. तत्पूर्वी दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसाचे वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पडत्या पावसातही फेर धरला, फुगडी खेळली आणि चिखल अंगाला लावून घेत आनंद लुटला. पाऊस आला तरी मात्र रिंगण सोहळा ठिकाणावरील गर्दी काही कमी झाली नसल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी आपल्यासोबत असलेल्या प्लास्टिकच्या गोण्या अन् छत्र्या यासोबत मिळेल ते साहित्य डोक्यावर धरून पावसापासून बचाव करीत कोणी भजन म्हणण्यात दंग तर कोणी तुकाराम व विठ्ठलाच्या जयघोष करतानाचे चित्र दिसून आले. अशातच पाऊस थांबला अन् भक्तिरसात चिंब झालेल्या वारकऱ्याच्या तोंडून आपसूकच काय तो पाऊस...काय ती वारकऱ्यांची गर्दी अन् काय हा नयनरम्य रिंगण सोहळा...असा संवाद ऐकावयास मिळाला.
-------------
लहान मुलं, ज्येष्ठांची मोठी गर्दी
शुक्रवारी दुपारनंतर भंडीशेगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रिंगण सोहळा ठिकाण चिखलमय झाले होते. मात्र, लहान मुलांपासून ९० पेक्षा अधिक वर्षांच्या ज्येष्ठांचा आनंद, उत्साह वारीत सहभागी झाल्याने तो पावसामुळे कमी झाला, असे किंचितही जाणावले नाही. विठ्ठलाचा जयघोषात लाखो वारकरी एकामागून एक येणाऱ्या छोट्या-छोट्या दिंड्यांचे दर्शन घेत होते. रिंगण सोहळ्या ठिकाणी हजारो वारकरी दाखल झाले होते.
------------
खाकी वर्दीही भक्तिरसात दंग
शुक्रवारी भंडीशेगाव येथे झालेल्या रिंगण सोहळ्याच्या मैदानावर परजिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वारीमधील प्रत्येक वारकऱ्याचा आदर केला. माऊली... माऊली म्हणत शिस्तप्रिय राहण्याचा प्रेमळ सल्ला दिला. एवढेच नव्हे तर मोहोळ तालुक्यातील एका होमगार्ड महिलेने फुगडीचा फेर धरत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यामुळे अत्यानंद झालेल्या अनेक पोलिसांनी पुढच्या वर्षी ड्यूटी नाही मिळाली तरी सुट्टी काढून वारीत सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला.
----------