निधी कोठून मिळणार पांडुरंगच जाणो..!

By Admin | Published: June 7, 2014 01:09 AM2014-06-07T01:09:05+5:302014-06-07T01:09:05+5:30

आषाढी वारी: तीन कोटी दिले, तीन कोटींसाठी शासनाने केले हात वर

Pandurang be sure to get fund from .. | निधी कोठून मिळणार पांडुरंगच जाणो..!

निधी कोठून मिळणार पांडुरंगच जाणो..!

googlenewsNext


सोलापूर: आषाढीसाठी पंढरीला येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी निधीची मोठ्या प्रमाणावर मागणी असताना राज्य शासनाने हात वर केले आहेत. वारीसाठी सहा कोटींची गरज असताना तरतूद केलेल्या तीन कोटींच्या खर्चाचे नियोजन झाले आहे. जि.प., पंढरपूर नगरपालिका व अन्य कार्यालयाकडून मागणी आलेल्या ३ कोटी २९ लाखांची तरतूद कोठून होणार, हे आता देवच जाणे...!
आषाढी वारीसाठी देशभरातून वारकरी पंढरपूरला येतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत गहिनीनाथ व संत गजानन महाराज या प्रमुख सात पालख्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीला येतात. या पालखी मार्गावरील गावांचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषद वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करते. यावर्षी मात्र हा निधी नसल्याने वारीसाठी लागणाऱ्या पैशाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. जिल्हा नियोजनच्या निधीतून तीन कोटींची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन मंडळाने २५२ कोटी ३९ लाखांचे बजेट मंजूर करुन शासनाकडे पाठवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत आषाढी वारीसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली.
तोंडी सांगितले, चर्चाच नाही
पालखी तळांची दुरुस्ती, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, पालख्या येण्याअगोदर व मुक्काम आटोपल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी पावडर टाकावी लागते. पाणी शुद्धीकरण, तात्पुरती शौचालये, तात्पुरत्या मुतारीची व्यवस्था व पालखी तळावर गरज असलेल्या ठिकाणी मुरुम टाकण्यासाठी जि.प. ग्रामपंचायत विभागाने दोन कोटी २० लाखांची मागणी केली आहे. किमान एक कोटी १० लाख मिळतील असे तोंडी सांगितले असले तरी एक जूनच्या नियोजन बैठकीत यावर चर्चाच झाली नसल्याने निधी मिळण्यावर प्रश्नचिन्ह उभारले आहे.
-----------------------------------
तीन कोटी ३० लाख देणार कोठून?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत पाणी, आरोग्य व स्वच्छतेसाठी निधी देण्याची मागणी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी केली होती. पवार यांनी नियोजन मंडळाकडे मागणी करा असे सांगितले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाने दोन कोटी २० लाखांची मागणी नियोजन मंडळाकडे केली आहे. एक कोटी १० लाख देतो म्हणाले परंतु तरतूदच केली नाही. याशिवाय वैद्यकीय अधीक्षक पंढरपूर यांनी ५ लाख, पंढरपूर नगरपालिका ४५ लाख, कार्यकारी अभियंता पंढरपूर यांनी १८.२० लाख, कार्यकारी अभियंता अकलूज यांनी १८.२८ लाख, जिल्हा आरोग्य अधिकारी २३ लाख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी २ कोटी २० लाख असे तीन कोटी २९ लाख ४८ हजारांची मागणी नियोजन मंडळाकडे केली आहे.
-------------------
तीन कोटींतून जि.प. ला पालखी मार्गावरील रस्त्यांसाठी एक कोटी ९५ लाख देण्याचे नियोजन
एक कोटी ५ लाखांचा निधी बार्शी तालुक्यातील शेंद्री-वारदवाडी रस्त्यांच्या कामांना देणार
सातही पालखी मार्गावर ९४ गावे येतात. पालख्यांचे ४३ ठिकाणी मुक्काम

Web Title: Pandurang be sure to get fund from ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.