पांडुरंग दिड्डी 'बीआरएस'च्या मार्गावर; अर्थमंत्री हरिष राव यांच्याकडून फोन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 29, 2023 03:51 PM2023-07-29T15:51:01+5:302023-07-29T15:51:13+5:30
भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी हे भाजप शहर अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. तशी चर्चा पक्षांतर्गत सुरू होती.
सोलापूर : पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन मनपा माजी विरोधी पक्षनेता पांडुरंग दिड्डी हे भारतीय जनता पक्ष सोडण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. ते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव यांनी दिड्डी यांच्याशी फोनवर चर्चा केली असून प्रवेशाबाबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबत दिड्डी यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगले. अधिक बोलायचे टाळले.
भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी हे भाजप शहर अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. तशी चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. दिड्डी हे विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे आहेत. यासोबत सुभाष देशमुख यांच्याशी त्यांचा चांगला संपर्क आहे. पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पद्मशाली समाजातील एका ज्येष्ठ नेत्याला शहराध्यक्ष पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा पक्षांतर्गत होती. ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. याच दरम्यान बीआरएस पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर होती. शहराध्यक्ष पदावर आपली वर्णी लागेल, या आशाने ते थांबून होते. परंतु, पक्षाकडून संधी न मिळाल्याने ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय देतात. त्यामुळे दिड्डी हे सुद्धा नागेश वल्याळप्रमाणे बीजेपी सोडून बीआरएस मध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा पूर्व भागात सुरू आहे. याबाबत दिड्डी यांच्याकडून पुष्टी मिळालेली नाही.