पंढरीचा पांडुरंग.. अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन् तुळजाभवानी महाराष्ट्राला खुणावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 05:09 PM2022-04-10T17:09:57+5:302022-04-10T17:10:03+5:30

ब्रँडिग व्हायला हवं : पर्यटनास चालना देतोय सोलापूर जिल्हा

Pandurang of Pandhari .. Swami Samarth Antuljabhavani of Akkalkot marks Maharashtra | पंढरीचा पांडुरंग.. अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन् तुळजाभवानी महाराष्ट्राला खुणावतेय

पंढरीचा पांडुरंग.. अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन् तुळजाभवानी महाराष्ट्राला खुणावतेय

googlenewsNext

सोलापूर : हजारो वर्षांचा इतिहास असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने लाखो भाविकांची नेहमीच रेलचेल असते. भागवत सांप्रदायाचं दैवत असणाऱ्या एकट्या पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासासाठी वर्षाला एक कोटी भाविक भेट देतात. जिल्ह्याला लागूनच असलेल्या तुळजाभवानीसाठीही १८ ते २० लाख आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांसाठीही पर्यटकांची संख्या जवळपास १२ लाखांच्या घरात जाते. याशिवायही अनेक पर्यटनयुक्त स्थळे आहेत. सोलापूर जिल्ह्यात पर्यटन चळवळ मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी गरज आहे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीची.

पर्यटनवाढीसाठी सोलापूर जिल्ह्यातील भौतिक वातावरणही पोषक आहे. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला नावाजलेली धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. यात पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, बाजूच्या जिल्ह्यातले श्री तुळजाभवानी मंदिर, कर्नाटकातले गाणगापूरचे श्री दत्त मंदिर या मोठ्या पर्यटनस्थळाशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातले हत्तरसंग कुडल, गौडगाव हनुमान मंदिर, सोलापूरचा भुईकोट किल्ला, अकलूजचे आनंदी गणेश मंदिर याशिवाय अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील स्थळांना पर्यटकांनी आकर्षित व्हावे यासाठी चालना द्यायला हवी, अशी अपेक्षा सुजाण सोलापूरकरांमधून होऊ लागली आहे.

-----

पंढरपुरात वर्षाला एक कोटी भाविक

दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज किमान २५ हजार भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात. शिवाय प्रत्येक पंधरवाडी एकादशीसाठी ही संख्या ५० ते ६० हजारांच्या घरात जाते. आषाढी एकादशी वारीसाठी १० ते १२ लाख भाविक, कार्तिकी वारीसाठी ६ लाख, चैत्री आणि माघी वारीसाठी २.५ ते ३ लाख पर्यटक भाविक येतात. या मोठ्या वारीला येणाऱ्या भाविकांना वगळता वर्षाला जवळपास १ कोटी पर्यटक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. ही पर्यटनवाढीला चालना देणारी बाब असल्याच्या भावना अनेक सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळींमधून व्यक्त होत आहेत.

----

 

तुळजाभवानीसाठी वर्षाला १२ लाख पर्यटक

तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा वगळून वर्षभरात १८ ते २० लाख भाविक, पर्यटक दर्शनाच्या निमित्तानं येतात. आठवड्यातले रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी रोज ५० हजार भक्तगण येतात. नवरात्रात १ ल्या ते ४ थ्या माळेपर्यंत दररोज १ लाख भाविकांची गर्दी असते. त्यानंतर ५ व्या माळेपासून शेवटच्या माळेपर्यंत २ ते अडीच लाख भाविकांची रेलचेल असते. तुळजापूर नगरपरिषदेने दररोज सरासरी ५० हजार भक्तगण येतात, असे सर्वेक्षण केले आहे.

-----

अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन् गाणगापूरचे दत्त मंदिर

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची ख्याती सर्वदूर आहे. महाराष्ट्राबाहेरूनही पर्यटक येथे आवर्जून येतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या सकारात्मक ऊर्जेने आवर्जून दूरदूरवरून येतात. स्वामींच्या प्रकटदिनाला १ लाख पर्यटक येतात. पौर्णिमेला ही संख्या ७५ हजार याशिवाय संकष्ट चतुर्थी, मोठ्या एकादशी आणि दैनंदिन अशी वर्षाला १० ते १२ लाख पर्यटकांची हमखास गर्दी होते. येथून जवळच कर्नाटकातील गाणगापूरचे श्री दत्त मंदिर असल्याने एकाच प्रवासात या देवस्थानचेही दर्शन घेण्यावर पर्यटकांचा भर असतो. ही संख्याही ७ ते ८ लाखांच्या घरात असते.

----

पर्यटनास चालना देणारा जिल्हा

- महाराष्ट्रातून पर्यटनाच्या निमित्तानं सोलापुरात येणाऱ्या लोकांना एकाच प्रवासात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, मंगळवेढ्याच्या दामाजीपंतासह संतांची भूमी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, राजवाडा, शस्त्रागृह, गाणगापूरचे दत्त मंदिर, तुळजापूरची तुळजाभवानी, मार्डीची यमाईदेवी यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रेक्षणीय स्थळे पाहतात येतात. अभ्यासकांसाठीही येथे हजारो वर्षांची ऐतिहासिक स्थळे आहेत. इथला भुईकोट किल्ला, कवीराय रामजोशी, शुभराय महाराजांची भूमी, मूकपट, बोलपटाचा सांस्कृतिक वारसा अशा अनेक स्थळांचं ब्रँडिंग व्हायला हवं, असा सूर सोलापूरकरांमधून उमटू लागला आहे.

Web Title: Pandurang of Pandhari .. Swami Samarth Antuljabhavani of Akkalkot marks Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.