पांडुरंग धावला कोरोना रुग्णांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:56+5:302021-04-23T04:23:56+5:30
वेदांता व व्हिडिओकॉन भक्त निवासातील खोल्या व त्यामधील २०० बेड नि:शुल्क उपलब्ध केल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ...
वेदांता व व्हिडिओकॉन भक्त निवासातील खोल्या व त्यामधील २०० बेड नि:शुल्क उपलब्ध केल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच सद्यस्थितीत पंढरपूर शहर व परिसरात देखील मागील १५ दिवसांपासून रोज २०० ते २५० कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत.
पंढरपूर शहर व परिसरातील सर्व कोविड रुग्णालये भरलेली असून, ६५ एकर व श्री गजानन महाराज भक्तनिवास येथील कोविड केअर सेंटर मध्ये देखील जागा उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी असलेली जागेची निकड लक्षात घेता, सर्व्हे नं. ५९ येथील वेदांता व व्हिडिओकॉन भक्तनिवासाच्या खोल्या व बेड गरज पडल्यास उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व इतर सर्व सदस्यांशी याबाबत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली होती.
डॉ. अपर्णा तळेकर (रा. भोसे) यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना उपचार करण्यासाठी ‘कोरोना केअर सेंटर व प्रायमरी कोरोना हेल्थ केअर सेंटर’ सुरू करण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास नाममात्र दराने भाडे तत्त्वावर मिळावे अशी मागणी केली होती. त्याअनुषंगाने मंदिर समितीने बुधवारी विशेष सभेमध्ये मंदिर समिती ही धर्मादाय संस्था असल्याने तसेच पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने वेदांता व व्हिडिओकॉन भक्तनिवासातील खोल्या व त्यामधील २०० बेड नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.