संतांच्या पालख्या पंढरीसमीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:18 AM2018-07-20T05:18:36+5:302018-07-20T05:19:31+5:30
कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत़
पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह अन्य पालख्या पंढरी समीप आल्या आहेत. शिवाय कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत़. सर्व पालखी सोहळ्यांमध्ये सुमारे सहा लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो़
पंढरीत दाखल होत असलेले वारकरी आपापले साहित्य मठ, मंदिर, धर्मशाळा आदी ठिकाणी ठेवून चंद्रभागेत पवित्र स्नान करून भाविकांची दर्शन रांगेत सहभागी होत आहेत. त्यामुळे गुरुवारी दर्शनरांग ही पत्राशेड व तात्पुरत्या शेडच्या पुढे गोपाळपूर रस्त्यापर्यंत गेली आहे़
दिंड्यांची सोय ६५ एकर परिसरात
आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या दिंड्यांची सोय ६५ एकर परिसरात करण्यात आली आहे़ दिंड्यातील भाविकांसाठी या परिसरात वीज, पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य केंद्र आदी सर्वप्रकारची सोय करण्यात आली आहे़ दिंडीप्रमुखांनी आपण नोंदणी केलेल्या प्लॉटमध्ये तंबू मारावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी केले आहे़
गोल रिंगण, उडीच्या खेळांनी घालविला शीणभाग
वेळापूर (जि. सोलापूर) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण गुरुवारी खुडूस फाटा येथील मैदानावर चैतन्यमयी वातावरणात पार पडले. निसर्गाने उत्तम साथ दिल्याने रिंगण सोहळा रंगला. तेवढाच रंग नंतर दिंडीकरांच्या उडीच्या खेळाला चढला. वारीतील या नव्या रंगात न्हाऊन निघालेले वारकरी आपला अवघा शीणभाग विसरले.
सकाळी ११ वा.२२ माऊलींची पालखी खुडूस फाटा मैदानावर पोहोचली. तिथे आखलेल्या गोल रिंगणाभोवती लाखो वारकरी अगदी सकाळपासूनच जागा धरून बसले होते. रिंगणस्थळी माऊलींचे आगमन होताच चैतन्याची एकच लहर उठली. माऊली... माऊलीच्या गजराने आसमंत भारावून गेला होता. बाहेरच्या रिंगणातून दिंड्यांसह माऊलींनी प्रवेश केला. माऊली बाहेरच्या रिंगणातून नाचत डुलत ओट्यावर पोहोचली. त्यानंतर चोपदाराच्या आदेशानंतर रथापुढील दिंडी क्रमांक १४ असलेल्या भोपळे दिंडीमधील जरीपटकाधारक मानकºयाने रिंगण घातले. त्यानंतर माऊलीच्या अश्वांनी दोन रिंगण पूर्ण केले.
माळीनगरात तुकोबारायांचे उभे रिंगण
माळीनगर (जि. सोलापूर):
तुझ्या चरणाची धूळ, लागो माझ्या भाळी।
सेवा घडावी जन्मोजन्मी तुझी, तूच आमुची माऊली।।
सकाळचे आनंदी आणि उत्साही वातावरण, अकलूजच्या प्रस्थानानंतर अगदी जवळच असलेल्या ठिकाणी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात व फुगडी, मनोरे आदी ग्रामीण खेळांचा आनंद घेत माळीनगर येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण गुरुवारी पार पडले. वारकºयांनी विठुनामाचा गजर करीत आनंद
साजरा केला.
सकाळी सात वाजता सोहळा अकलूजचा मुक्काम संपवून माळीनगरकडे मार्गस्थ झाला. वाटेत मुक्कामी असलेल्या दिंड्या रोडवर येऊन सोहळ्यात सहभागी होत होत्या. सोहळा कर्मवीर चौकात आल्यावर त्या ठिकाणी आरती करण्यात आली. तोपर्यंत माळीनगर येथे प्रशासनाच्या वतीने रिंगणाची तयारी पूर्ण केली होती. बरोबर साडेआठ वाजता अश्व व नगारागाडीचे आगमन झाले. मॉडेल प्रशालेजवळ अश्व जाऊन थांबले. रिंगणाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.