‘विठ्ठला’च्या भेटीला येणाऱ्या रेल्वेमार्गाचा कागदी प्रवास अद्याप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:36+5:302021-02-10T04:22:36+5:30
भाग -१ माळशिरस : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित इंग्रजकालीन सर्व्हे झालेला लोणंद-पंढरपूर मार्गाच्या मंजुरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होऊन दोन वर्षे उलटली. ...
भाग -१
माळशिरस : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित इंग्रजकालीन सर्व्हे झालेला लोणंद-पंढरपूर मार्गाच्या मंजुरीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होऊन दोन वर्षे उलटली. तर स्वातंत्र्यानंतरही सुमारे ७३ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या विकासाच्या जाहिरनाम्यातही या मार्गाचे नाव हमखास सामाविष्ट केले जाते. मंजुरी, सर्व्हे, फेरसर्व्हे अशा बातम्यांमुळे सध्या तरी यातील फलटण-पंढरपूर रेल्वेची चर्चा रुळावर येत आहे. मात्र अद्यापही बहुप्रतीक्षीत ‘विठ्ठल एक्स्प्रेस’ कागदाच्या रुळावर अटकून राहिली आहे. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘विठ्ठला’च्या भेटीला येणाऱ्या रेल्वे मार्गावरील कागदी प्रवास अद्याप सुरूच आहे.
लोणंद-पंढरपूर या रेल्वेमार्गाचा १९०८ मध्ये इंग्रज सरकारणे सर्व्हे केला होता, तर १९१८ मध्ये मंजूर झाला. या जमिनीच्या सातबारा व ८-अ च्या उताऱ्यावर रेल्वे विभाग भारत सरकार असा शेरा येऊ लागला. २००८ साली पुन्हा फेरसर्व्हे करण्यात आला.
सध्या लोणंद ते फलटण मार्ग तयार झाला आहे. त्यामुळे आता फलटण-पंढरपूर १०५ कि.मी. अंतराचा मार्ग करावा लागणार आहे. यात लहान-मोठी १७ स्थानके आहेत. यासाठी ६२५ हेक्टर भूसंपादन झाले आहे. मात्र आणखी १२८ हेक्टरची आवश्यकता असताना सध्या पुन्हा नव्या मार्गाचा सर्व्हे सुरू झाला आहे. या संबंधातील आकडेवारी सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.
रेल्वेचा कागदावरचा प्रवास
१९१८ ला मंजूर झालेल्या मार्गासाठी तब्बल ९९ वर्षांनी म्हणजे २०१७मध्ये या मार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकालात ११४९ कोटी रुपये निधी मंजूर झाला. पहिल्या वर्षी १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला. यानंतर प्रतीवर्षी दहा कोटी रुपये रक्कम बजेटमध्ये सामाविष्ट केली आहे. २०२० मध्ये या मार्गासाठी लागणाऱ्या खर्चाचा ५० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, यासाठी केंद्राचा राज्याला पत्रव्यवहार झाला. २०२१ मध्ये पुन्हा या मार्गाचा नव्याने सर्व्हे सुरू झालेला दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीला येणाऱ्या रेल्वे मार्गावरील कागदी प्रवास अद्याप सुरूच आहे.
---
लोणंद-पंढरपूर रेल्वे हा एक थट्टेचा विषय झाला आहे. या पट्ट्यातून दिग्गज नेत्यांनी राज्यात व केंद्रात प्रतिनिधित्व केले आहे. मात्र या मार्गाचा वापर निवडणुकीत दाखवायला गाजर म्हणून केला जातो. पक्ष, संघटना, नेते यांच्या विकासाच्या संकल्पना नेमक्या काय? असाव्यात? सर्वे झालेला रेल्वेमार्ग शंभर वर्षांहून अधिक रेंगाळतो, यापेक्षा या भागाचे दुर्दैव काय?
- उपेंद्र केसकर
अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत