बेदाणा शेडवरील कागद, शेडनेट फाटले; केळी झाली जमीनदोस्त, घरावरील पत्रेही उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:19+5:302021-04-14T04:20:19+5:30
मागील वर्षापासून देशावर असलेले कोरोनाच्या संकटाने शेतीत पिकविलेले द्राक्ष, केळी, भाजीपाला आदींसह विविध प्रकारचा शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत ...
मागील वर्षापासून देशावर असलेले कोरोनाच्या संकटाने शेतीत पिकविलेले द्राक्ष, केळी, भाजीपाला आदींसह विविध प्रकारचा शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. असे असतानाच या परिसरातील ४० टक्के द्राक्षबागांना पीकच आले नाही. त्यामुळे असहाय्य झालेल्या शेतकऱ्यांनी आलेला द्राक्षाचा माल रात्रीचा दिवस करून जोपासला. द्राक्षाचा बेदाणा करण्यासाठी द्राक्षावर प्रक्रिया करून सुकविण्यासाठी शेडवर टाकला आहे.
सोमवारी सायंकाळी करकंबच्या उत्तर बाजूकडून झालेला अवकाळी पाऊस व सुसाट्याच्या वाऱ्यामुळे काहींचे शेडवरील कागद व शेडनेट उडून गेले. तर काहींचे पूर्णपणे फाटून बेदाणा भिजून चिखल झाला. यामुळे बेदाण्याची प्रतवारी कमी होऊन भाव कमी मिळणार असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी होणार आहे. करकंबसह बार्डी आणि जाधववाडी येथील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना याची मोठी झळ बसली आहे. भोसे येथील काही शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे. शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी पोपट धायगुडे, महादेव व्यवहारे, सुभाष व्यवहारे, दिलीप व्यवहारे, शंकर डोळे, तानाजी काळे, विश्वनाथ भिंगारे यांनी केली आहे.