आई-वडिलांची मानसिकता; लेकीचा संसार थाटायचाय; जावयालाही सावरायचंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:49 PM2021-07-26T17:49:53+5:302021-07-26T17:50:33+5:30
हुंडाबंदी नावालाच; पैसा, बंगला अन् गाडी मागताहेत अन् देताहेतही !
सोलापूर : पोटच्या लेकींचं आई-बाबांना लई कौतुक असतं. एकदा ना एकदा तिचं लग्न होणारच. त्यानंतर ती सासरी जाणारच, ही खूणगाठ बांधणाऱ्या आई-वडिलांना तिच्या संसाराची काळजी लागते. लेक सुखी रहावी म्हणून तिला काय देऊ अन् काय नाही, याचा विचार आई-वडील बाळगत असतात. लेकीचा संसार थाटावा म्हणून पैसे, बंगला, फ्रीज कधी-कधी टू अथवा फोर व्हीलर देऊन मोकळे होत असताना जावयाला विकत घेण्याचा प्रसंग त्यांच्यावर उद्भवत असतो. त्यावरुन हुंडाबंदी आता कागदावरच राहिल्याचे स्पष्टपणे जाणवते.
राज्यात अनेक सरकारं आली अन् गेलीही. एका सरकारमधील दिवंगत गृहमंत्र्यांनी लग्नात हुंडा मागणाऱ्यांची वरात काढू, असा इशारा दिला होता. तो इशारा हवेतच विरला. त्यामुळे हुंड्यासाठी छळाचे गुन्हे अल्प प्रमाणात दाखल होत असतात. मुलीला शिक्षण द्यायचे. शिक्षण घेतल्यावर काही मुली स्वत:च्या पायावर उभे राहतात. वास्तविक अशा मुलींच्या लग्नात कुणी हुंडा मागता कामा नये; परंतु लेकीच्या हौसेसाठी, सासरच्या लोकांनी तिला सूनऐवजी लेक समजून तिला वागवावे. तिचा शारीरिक अथवा मानसिक छळ होऊ नये म्हणून आई-वडील वाट्टेल ते जावयाबरोबर सासरच्या लोकांची हौस पुरवित असतात. शेवटी व्हायचं ते होतंच. ऐनकेन कारणावरुन कधी पती, कधी सासू अन् सासरा तर कधी दीर, नणंद ही मंडळी त्रास द्यायला सुरुवात करतात.
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
- २०१७ - ४३५
- २०१८ - ४२३
- २०१९ - ३९२
- २०२० - ३८८
- २०२१ - ९५
हुंडा म्हणायचा की लिलाव
- आपली मुलगी सुखी रहावी म्हणून चांगले स्थळ निवडताना मुलासह सासरच्या लोकांची इच्छा पूर्ण केली जाते.
- लग्नाआधी साखरपुडा, त्यानंतर लग्न, पुढे चोळी अन् नात-नातवांच्या नामकरण सोहळ्यातही जावयासह सासरच्या लोकांची इच्छा पूर्ण करावी लागते.
- लग्नानंतर घरघुसणी असेल अथवा पहिलीच दिवाळी म्हणून जावयाचा चांगला मानपान केला जातो. जावई पहिल्यांदाच आले म्हणून मनासारखे कपडे, सोन्याची अंगठीही घालावी लागते. यावरुन या बाबींना हुंडा म्हणायचा की जावयाचा लिलाव ?
अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंत
- हुंडा मागणे अथवा देणे हा गुन्हा आहे. याचा अशिक्षित मंडळी फारसा विचार करीत नसले तरी याचा उच्च शिक्षित मंडळी बिलकुल विचार करीत नाहीत.
- आपल्या घरी येणारी सून ही माहेरच्या साऱ्यांचाच त्याग करणारी असते. घरी येणाऱ्या नववधू, सुनेच्या आई-वडिलांची परिस्थिती कधीच जाणून घेत नाहीत. किमान शिक्षित मंडळींनी तरी ती परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
- हुंड्यासाठी छळ होत असेल तर थेट पोलिसांमध्ये तक्रार अथवा फिर्याद देता येते. आपल्या लेकीचा कितीही मानसिक अथवा शारीरिक छळ होत असेल तर तिचे आई-वडील मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळे हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी कमी प्रमाणात येत असतात.
आई-वडीलही जबाबदार असतात !
आपली लेक शिकलेली आहे. पती अथवा सासरची मंडळी तिला सांभाळत नसतील तर ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकते, ही भावना आता कमी होत चालली आहे. तिला त्रास जरी झाला तरी पोलिसांमध्ये तक्रार करायची. नंतर कोर्टाचे हेलपाटे मारायचे, ही चिंताही आई-वडिलांना असते. या चिंतेवर पाणी सोडून आई-वडिलांनी खंबीरपणे उभे राहिले तर जावई अन् सासरच्या मंडळींना चांगला धडा शिकवता येईल. सासरच्या मंडळींकडून लेकीच्या छळाबाबत आई-वडीलही जबाबदार असतात.
मुलगी शिकली तर ती दोन कुटुंबांना (माहेर अन् सासर) शिक्षित करीत असते. घरी येणारी सून ही जणू लक्ष्मीच असते. या लक्ष्मीचा सन्मान झाला पाहिजे. तिचा छळ म्हणजे आपण लक्ष्मीपासून दूर जातोय, याचा विचार आजच्या तरुण पिढींनी केला पाहिजे.
-प्रथमेश तोवर, युवक.
आज काळ बदलला आहे. काही ठिकाणी मुलगी अन् नारळ घेऊन लग्न लावले जाते. ही चळवळ लोकचळवळ झाली पाहिजे. तरच हुंडाबंदी हद्दपार होणार आहे. आजची युवा पिढी ही शिक्षित आहे. या युवा पिढीने हे काम हाती घेतले तर हुंड्यासाठी कुठल्याच मुलीचा (लेक, बहीण आदी) शारीरिक आणि मानसिक छळ होणार नाही.
-ज्ञानेश्वर बनसोडे, युवक