मुलांबरोबर पालकही रांगेत; दाखल्यांसाठी सेतू कार्यालयं होताहेत हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 06:49 PM2021-07-26T18:49:51+5:302021-07-26T18:49:51+5:30
शैक्षणिक दाखले काढण्यासाठी गेल्या आठवडाभरात सेतू कार्यालयात गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली
सोलापूर : कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशा काळातही शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक दाखले काढण्यासाठी गेल्या आठवडाभरात सेतू कार्यालयात गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. मुलांबरोबर पालकही रांगेत उभे राहिलेले दिसले. मागील सव्वा वर्षात जवळपास एक लाख दाखल्यांचे वितरण झाले आहे.
मागील वर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाचा कहर सुरू झाला. मार्चनंतर पूर्ण लॉकडाऊन लागू झाला. त्यानंतर तीन महिने सेतू कार्यालय बंद होते. ऑक्टोबरनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होतील, अशी अपेक्षा होती; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्येही शाळा व महाविद्यालये सुरू झाली नाहीत. निर्बंधात कमी-अधिक प्रमाणात शिथिलता येत असल्यामुळे भविष्यात शाळा व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा असल्यामुळे अनेकजण शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करून घेत आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सर्वाधिक ५५ हजार ६७० प्रतिज्ञापत्रांचे वितरण झाले आहे. त्यानंतर पाच हजार जाती दाखल्यांचे वितरण झाले आहे. १३ हजार २६० उत्पन्न दाखले तर ३ हजार ५०६ रहिवासी दाखल्यांचे वितरण झाले आहे.
कोरोना नियमांचे पालन
मागील महिनाभरापासून विविध दाखल्यांसाठी नागरिक सेतू कार्यालयात येत आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळून दाखल्यांचे वितरण होत आहे. सॅनिटायझरचाही वापर होतोय, असे सेतू केंद्र चालकांनी सांगितले.